अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- दोन दिवसांपूर्वी राहाता पोलीस ठाण्याच्या आवारातून चोरीस गेलेली प्रवाशी रिक्षा राहुरीत सापडली; मात्र रिक्षा ताब्यात घेत चोरासही पकडले. मात्र काहीवेळानंतर चोरासही सोडून देण्यात आले. विशेष म्हणजे तक्रार नसतानाही पोलिसांनी तपास लावल्याने नागरिकांत चर्चेला उधाण आले आहे.
रविवारी भर दुपारी राहाता पोलीस ठाण्याच्या आवारात लावलेली एका पोलिसाची एक रिक्षाच अचानक गायब झाली. काही तासांनंतर हा प्रकार लक्षात येताच पोलीस स्टेशनचा सीसीटीव्ही चेक केला असता एक तरुण रिक्षा नेताना दिसून आला. राहाता व शिर्डीत शोध घेतला; मात्र सदर रिक्षा आढळली नाही.
याबाबत परिसरातील पोलीस ठाण्यात फोन करून रिक्षाची माहिती दिली. दोन दिवस रिक्षाचा पत्ता लागला नाही. मात्र मंगळवारी सदर रिक्षा राहुरीत असल्याची माहिती राहाता पोलिसांना मिळाली. तातडीने दोन पोलिसांनी राहुरीला जाऊन रिक्षा ताब्यात घेऊन रिक्षा पळवून नेणारा तरुण ताब्यात घेऊन राहात्याला आणले.
रिक्षा ताब्यात घेत सदर तरुणावर कोणतीही कारवाई न करता संध्याकाळी उशीरा सोडून देण्यात आले. पोलीस ठाण्याच्या आवारातून रिक्षाची चोरी होऊनही तिची तक्रार दाखल न झाल्याने तो शहरात चर्चेचा विषय ठरला आहे. अनेकवेळा चोरीची तक्रार दाखल होऊनही इतर वाहनांचा तपास लागत नाही.
मात्र तक्रार नसलेल्या रिक्षाचा तपासही लागतो रिक्षाही सापडते व आरोपीला सोडूनही दिले जाते.हे सर्व परस्पर करण्यात आले. याबाबत वरिष्ठ अधिकार्यांनाही अंधारात ठेवले गेल्याची चर्चा सुरू असून चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींना असे परस्पर सोडले गेले तर वाहन चोरीच्या घटना कशा थांबतील. त्या रिक्षाचा मालक कोण? तसेच चोर कोण? हे मात्र तक्रार दाखल न केल्याने गुलदस्त्यातच राहिले.