Ahmednagar News : महाराष्ट्रात साधू, महाराज, मठ आदींची काही कमी नाही. महाराष्ट्र हा संतांची भूमी असल्याने अनेकांचा चटकन असल्या लोकांवर विश्वास बसतो. परंतु यातील काही लोक मात्र ढोंगी असतात हे काळाच्या ओघात समोर येते आणि अनेकांना धक्का बसतो.
दरम्यान अशाच काहीशा प्रकाराने अहमदनगरसह महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. एक प्रसिद्ध महंत कोल्हापुरात स्वतःच्याच शिष्येच्या खुनाच्या गुन्ह्यात आरोपी ठरला असून, तो फरार झाला असल्याची घटना घडली आहे. या महंताचे नाव महेश्वरानंद असे आहे.
श्रीरामपुरात नवरात्रोत्सव काळात छातीवर घटाची स्थापना करणाऱ्या या महंताच्या दर्शनासाठी लोकप्रतिनीधी तसेच अधिकाऱ्यांनी हजेरी लावली होती. या महंताच्या दर्शनासाठी भाविकांची दररोज अक्षरशः रिघ लागत होती. परंतु आता कोल्हापुरातील ही बातमी अहमदनगर जिल्ह्यात येऊन धडकताच विविध चर्चांना उधाण आले आहे.
महेश्वरानंद यांचे मूळ नाव महेश अर्जुन माने आहे. त्याचा पन्हाळा तालुक्यातील देवठाणे येथे मठ आहे. त्याचा भाऊ बालकृष्ण महाराज याच्यासह तो मठाचे काम पाहतो. महंत महेश्वरानंद याचे पुणे, मुंबई, उस्मानाबाद, सोलापूर, पनवेल, सांगली येथे भक्त परिवार आहे.
मात्र या महंतावर वैष्णवी लक्ष्मीकांत पोवार (वय ३४, रा. शनिवारपेठ, कोल्हापूर) हिच्या खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक दिलीप पवार हे गुन्ह्याचा तपास करत आहेत.
आतापर्यंत या गुन्ह्यात मुलीची आई शुभांगी, भाऊ श्रीधर, तसेच दोन सेवेकरी यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. महंत महेश्वरानंद गुन्ह्यातील आरोपी असून, तो मात्र फरार झाला आहे. या मुलीचा विवाह कोल्हापुरातील एका तरुणाशी याच महंताच्या पुढाकारातून जुळविण्यात आला होता, मात्र मुलीने व तिच्या होणाऱ्या वराने काही दिवस विवाह न करता लिव्ह इनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला होता.
तो कुटुंबीयांना मान्य नव्हता, त्यामुळे आई व भावाने मुलीला महंताकडे नेले. तेथे तिची समजूत काढत विवाह करण्याचा आग्रह धरण्यात आला, मात्र तरीही मुलीने नकार कळविल्याने देवठाणे येथील मठात तिला मारहाण करण्यात आली. यातच मुलीचा मृत्यू झाला होता. सेवेकरी, आई व वडील यांनी महंतांच्या सांगण्यावरून मारहाण केल्याचा आरोप आहे.
या मुलीचे संपूर्ण कुटुंबीय महंताचे भक्त परिवारातील सदस्य आहेत. मुलीचा खून ३ एप्रिल २०२४ मध्ये घडला होता. त्यानंतर हळूहळू या गुन्ह्याची उकल होत गेली. आता महंतावर गुन्हा दाखल होऊन तो फरार होताच, ही बातमी श्रीरामपुरात येऊन धडकली.
त्यामुळे त्याला येथे पाचारण करणाऱ्या स्थानिक नेत्यांना टीकेला सामोरे जावे लागत आहे. महंताच्या दर्शनासाठी व नवरात्रीतील आरतीला जिल्ह्यातील काही राजकीय नेते व प्रशासनातील उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित राहिले होते. महंतांनी छातीवर घट स्थापनेच्या कृत्याचे त्यावेळी अनेकांनी गोडवे गायले होते.