अहमदनगर Live24 ,2 जून 2020 : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर खासदार सुजय विखे आणि भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्यात राजकीय वितुष्ट निर्माण झाले होते.
हा वाद थेट पक्षाच्या हाय कामांडपर्यंत गेला होता.परंतु आता त्यांनी पुन्हा एकदा एकत्रित राजकीय सूर आळवायला सुरू केले आहेत. याला जिल्हा बँक निवडणुकीचे कारण असल्याची चर्चा आहे.
कर्डिले यांचा सोमवारी वाढदिवस होता. यानिमित्त कर्डिले यांना विखे परिवाराने समक्ष भेटून शुभेच्छा दिल्या. यावरुन विखे-कर्डिले यांच्यात नवे राजकीय सूर जुळून येत आहेत, असे दिसते.
नोव्हेंबरमध्ये राज्याच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले. खासदार विखे-कर्डिले यांच्यात राजकीय वितुष्ट निर्माण झाले. कर्डिले यांच्या विधानसभेतील पराभवास त्यांच्या कार्यकर्त्यांनी विखे यांनाच जबाबदार धरले होते.
कर्डिले यांनी माजी पालकमंत्री राम शिंदे यांना सोबत घेऊन अनेक गुप्त बैठका घेत विखे यांच्यावर नाराजीचा सूर आवळला होता. या तक्रारींचा पाढा थेट माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दरबारात वाचला गेला. यावर विखे यांनी फक्त वेळ आल्यावर माझी भूमिका मांडेल असेच स्पष्टीकरण दिले होते.
1 जूनला माजीमंत्री राधाकृष्ण विखे, खासदार सुजय विखे, अण्णासाहेब म्हस्के, सुभाष पाटील यांनी कर्डिले यांची भेट घेत त्यांना वाढदिवसानिमित्त अभीष्टचिंतन केले.
आगामी जिल्हा बँक निवडणुकीसाठी विखे गटाकडून राजकीय जुळवाजुळव सुरु असल्याचे बोलले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून कर्डिले यांची नाराजी दूर करीत त्यांना पुन्हा जवळ करण्याचा विखे गटाचा प्रयत्न सुरु असल्याची चर्चा आहे.
दरम्यान, आमच्यातील वाद हे पक्षांतर्गत आहेत. प्रत्येक पक्षात असे वाद होतच असतात. राजकीय वाद जास्त काळ टिकत नाहीत, असा सूरही आमदार कर्डिले यांनी आळवला आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews