Ahmednagar Politics : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यभर राजकीय वातावरण तापलेले आहे. राजकीय पक्ष आणि नेते लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराला लागले आहेत. 19 एप्रिलला प्रत्यक्षात मतदानाला सुरुवात होणार असून संपूर्ण देशभर एकूण सात टप्प्यात मतदान होणार आहे. आपल्या राज्याबाबत बोलायचं झालं तर महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यात मतदान होणार आहे.
तसेच लोकसभा निवडणुकीचा निकाल हा चार जून 2024 ला लागणार आहे. महाराष्ट्रात यंदाची लोकसभा निवडणूक विशेष खास राहणार आहे. कारण की, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणि शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर ही पहिलीच मोठी निवडणूक राहील.
यंदा भाजपा अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना सोबतीने घेऊन लोकसभेत अधिकाधिक जागा मिळवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. भाजपाने राज्यात 45 पारचा नारा दिला आहे. दुसरीकडे महाविकास आघाडी देखील भाजपा प्रणित महायुतीला कडवी झुंज देणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यात आघाडीवर राहणार आहे.
पण शरद पवार गटाला यंदाच्या लोकसभा निवडणुकीत किती जागा मिळणार ? हे पाहणं खास ठरणार आहे. अशातच मात्र इंडिया टीव्ही- सीएनएक्सचा ओपिनियन पोल समोर आला आहे. त्यामध्ये शरद पवार गटाला लोकसभा निवडणुकीत किती जागा मिळू शकतात याविषयी अंदाज वर्तवण्यात आला आहे.
किती जागा जिंकणार शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
यंदाची निवडणूक शरद पवार गटासाठी विशेष निर्णायक ठरणार आहे. कारण की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर मूळ नाव आणि चिन्ह हे शरद पवार गटाकडून काढून घेतले आहे. शरद पवार गटाला तुतारी हे नवीन चिन्ह मिळाले असून ‘शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष’ असे नाव मिळाले आहे.
दरम्यान राष्ट्रवादीत उभी फूट पडल्याने यंदाच्या निवडणुकीत शरद पवार गटाला मोठा फटका बसू शकतो असे ऑपिनियन पोलमधून समोर आले आहे. यंदा शरद पवार गट दहा जागेवर लोकसभा निवडणूक लढवणार असून यापैकी त्यांना फक्त तीन जागा जिंकता येणार असे या पोलमध्ये म्हटले गेले आहे.
विशेष म्हणजे शरद पवार यांची कन्या अर्थातच सुप्रिया सुळे यांना देखील पराभवाचा सामना करावा लागू शकतो. सुळे ज्या जागेवरून निवडणूक लढवणार आहेत अर्थातच बारामती लोकसभा मतदारसंघावर देखील शरद पवार यांच्या गटाला पराभव स्वीकारावा लागणार असा अंदाज यात दिला गेला आहे.
तसेच, अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे उमेदवार उभे आहेत. मात्र येथे देखील शरद पवार गटाला पराभवाचा धक्का सहन करावा लागणार आहे.
अहमदनगरच्या जागेवर यंदा SP राष्ट्रवादी काँग्रेसकडून पारनेरचे माजी आमदार निलेश लंके यांना उभे करण्यात आले आहे. पण यावेळी निलेश लंके यांना विद्यमान खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील हे पराभूत करतील असे या पोलमध्ये म्हटले गेले आहे.
पण, यंदाच्या निवडणुकीत शरद पवार गट हा सातारा, माढा आणि शिरूर या तीन जागा जिंकू शकते असा दावा या ऑपिनियन पोल मध्ये केला गेला आहे. तथापि हा एक अंदाज आहे. 4 जूनला जेव्हा लोकसभेचा निकाल जाहीर होईल तेव्हाच नेमक कोण निवडून येईल हे समजेल.