मुंबई : राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अजित पवार पुन्हा एकदा नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर आली आहे. उपमुख्यमंत्रिपदाबाबत असलेल्या साशंकतेमुळे अजितदादा नाराज आहेत असे तर्क लावले जात आहे.
अखेर सुप्रिया सुळे यांनी फोन करुन अजित पवारांशी बातचित केली. अजितदादा सिल्व्हर ओकवर आल्यानंतर आम्ही पाच वाजता एकत्रच शपथविधीला येऊ, असं सुळेंनी सांगितलं.
परंतु अजित पवारांच्या मनात नेमकं काय सुरु आहे, असा प्रश्न पडला आहे. आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.
मुंबईत शिवाजी पार्कच्या भव्य मैदानात संध्याकाळी सहा वाजून 40 मिनिटांच्या मुहूर्तावर हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे.
राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रिपद देण्याबाबत महाविकासआघाडीच्या बैठकीत निश्चित झालं असले तरी उपमुख्यमंत्रिपदासाठी जयंत पाटील यांचं नाव आघाडीवर असल्यामुळे अजित पवार नाराज झाल्याचं बोललं जात आहे.
अजित पवारांना उपमुख्यमंत्रिपद हवं असल्यामुळे त्यांनी नाराजीचा सूर लावल्याची चर्चा आहे. अजित पवार यांना उपमुख्यमंत्रिपद देण्याबाबत ठरलं, तरी ते आज मंत्रिपदाची शपथ घेणार नसल्याचं म्हटलं जात आहे.