Maharashtra News : महायुतीचा रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार? असा प्रश्न राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्रकारांनी विचारला असता मंत्रिमंडळ विस्तार कधी करायचा हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच ठरवतील,
असे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे बोट दाखवत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत गूढ कायम ठेवले. ठाणे-नगर जिल्हा महामार्गासाठी भरघोस निधी देण्याचे देखील त्यांनी यावेळी मान्य केले.
शहापुरातील दिवंगत राजकीय नेते दशरथ तिवरे यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे गुरुवारी शहापुरात आले होते. यावेळी त्यांनी स्थानिक आमदार दौलत दरोडा यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.
यावेळी दरोडा यांच्याशी बंद दाराआड जवळपास अर्धा तास पवार यांनी राजकीय घडामोडींवर चर्चा केली. महाराष्ट्रातील महायुती सरकारचा रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार हा प्रचंड चर्चेचा विषय असून सध्या शिंदे गटातील अनेक इच्छुक आमदारांना मंत्रीपदाचे वेध लागले आहेत.
महायुतीत सहभागी झालेल्या अजित पवार गटालादेखील आणखी मंत्रीपदे व महामंडळे हवी आहेत. हा रखडलेला मंत्रिमंडळ व महामंडळे विस्तार दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
दिल्लीत यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच भाजपचे वरिष्ठ नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेत त्यांच्याशी याबाबत सविस्तर चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली. यामुळे लवकरच मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग मोकळा होईल, असे सांगण्यात येत आहे.
या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रसारमाध्यमांनी विचारले असता पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच मंत्रिमंडळ विस्तार करतील, अशी भूमिका मांडत विस्ताराबाबत विचारलेल्या मुख्य प्रश्नाला बगल देत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत सावध भूमिका घेतली.
यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना अजित पवार पुढे म्हणाले, लवकरच शहापूर तालुक्यातील चोंढे घाटघर नगर या मार्गावरील रखडलेल्या रस्त्याचे काम मार्गी लागणार असून या रस्त्यासाठी सरकारकडून निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी माहिती पवार यांनी यावेळी दिली.