अकोल्यात पिचड गटाचे वर्चस्व !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अकोले :- विधानसभा निवडणुकीत पिचडांचा दारुण पराभव केल्यानंतर सुसाट वेगाने निघालेल्या महाविकास आघाडीच्या एक्स्प्रेसला अकोले पंचायत समिती निवडणुकीत पिचड गटाने जबर धक्का देत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. अकोले पंचायत समितीच्या सभापतिपदी भाजपचे दत्तात्रय सबाजी बोऱ्हाडे, तर उपसभापतिपदी दत्तात्रय देवराम देशमुख हे विजयी झाले आहे.

अत्यंत तणावपूर्ण वातावरणात ही निवडणूक पार पडली. अकोले शहराला छावणीचे स्वरुप आले होते. नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राखीव असलेल्या पंचायत समितीच्या सभापतिपदासाठी भाजपचे दत्तात्रय बोऱ्हाडे, शिवसेनेचे नामदेव आंबरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. हात वर करून घेण्यात आलेल्या आवाजी मतदानाने बोऱ्हाडे यांना सात, तर आंबरे यांना पाच मते मिळाली.

उपसभापतिपदासाठी भाजपचे दत्तात्रय देशमुख, शिवसेनेचे देवराम सामेरे व पिचड गटाचे बंडखोर व गटनेते गोरख पथवे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. सामेरे यांनी अर्ज मागे घेतल्याने देशमुख व पथवे यांच्यात लढत झाली. हात वर करून झालेल्या आवाजी मतदानाने देशमुख यांना सात, तर पथवे यांना पाच मते मिळाली.

निवडीची सभा पिठासन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी शशिकांत मंगरुळे यांच्या अध्यक्षतेखाली व सहाय्यक निवडणूक अधिकारी तहसीलदार मुकेश कांबळे यांच्या उपस्थितीत झालीसभापतिपदाचे आरक्षण ओ.बी.सी आल्यानंतर राष्ट्रवादीचे पिचड समर्थक गटनेते असलेले गोरख पथवे यांनी पिचड यांना सोडून राष्ट्रवादी व विकास आघाडीबरोबर राहण्याचा निर्णय घेतला.

यावेळी पिचड समर्थक इतर तीन सदस्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे बहुमताने ठराव देवून पथवे यांचे गटनेतेपद रद्द करून सीताबाई गोंदके यांची गटनेतेपदी निवड केली. या निवडीसाठी जिल्हाधिकाऱ्यांसमोर अनेकदा सुनावणीही झाली.

यावेळी आ. डॉ. किरण लहामटे, माजी जि. प. अध्यक्ष अशोक भांगरे, बाजीराव दराडे यांनी महाविकास आघाडीचा सभापती, उपसभापती होण्यासाठी व्यूहरचना केली व राष्ट्रवादीचे गटनेते असलेले गोरख पथवे यांना बरोबर घेऊन नवीन गटनोंदणीला विरोध केला तसेच पथवे यांनी नवीन गटनोंदणीला आव्हान देऊन निवड प्रक्रियेला स्थगिती आणण्याची याचिका औरंगाबाद उच्च न्यायालयात दाखल केली होती.

पथवे यांचा व्हीप ग्राह्य धरून राष्ट्रवादीचे चार व सेनेचे चार सदस्य मतदान करून आघाडीचा सभापती, उपसभापती होणार असल्याचा दावा महाविकास आघाडीच्यावतीने करण्यात आला होता. मात्र, माजीमंत्री पिचड व माजी आ. पिचड यांनी अतिशय गुप्तपणे हालचाली करून निवड प्रक्रियेत शेवटपर्यंत सस्पेन्स कायम ठेवला.

यावेळी दोन्ही बाजूने दावा केला जात असल्याने फोडाफोडी, पळवापळवी होण्याची शक्यता होती. मात्र, पिचड समर्थक सर्व सदस्यांच्या नेतृत्वावर भक्कमपणे ठाम राहिल्याने पंचायत समिती हॉलमध्ये झालेल्या निवड प्रक्रियेत १२ सदस्यांपैकी हात वर करून झालेल्या मतदानात अडीच वर्षांपूर्वी अकोले पंचायत समिती निवडणुकीत भाजपचे ४, तत्कालिन पिचड गट राष्ट्रवादीचे ४, शिवसेनेचे ४ सदस्य निवडून आले होते.

तत्कालिन राष्ट्रवादीचे नेते माजीमंत्री मधुकरराव पिचड यांनी शिवसेनेच्या एका गटाला पाठिंबा देत रंजना मेंगाळ यांना सभापती तर उपसभापती मारूती मेंगाळ यांना केले होते. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जवळपास १०० पोलीस, सात पोलीस अधिकारी यांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

This Story First Publish on Ahmednagarlive24.com
No1 News Network Of Ahmednagar
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24