अहमदनगर Live24 टीम,25 सप्टेंबर 2020 :- कोरोनाचा प्रादुर्भावामुळे व्यवसायात मंदी आहे, बाजारपेठेत ग्राहक नाही आणि सामान्यांच्या रोजगारात घट झाली अशा कठिण परिस्थितीत शासनाने 8-10 रुपये प्रतिकिलोचे धान्य बंद केले आहे
ते पुन्हा रेशनवर मिळावे आणि सरसकट केसरी शिधापत्रक धारकांना हे स्वस्त धान्य उपलब्ध करुन द्यावे, अशी मागणी नगर शहर काँग्रेसच्यावतीने शासनाला करण्यात आली. शहराध्यक्ष बाळासाहेब भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी संदिप निश्चित यांना निवेदन देऊन वरील मागणी करण्यात आली. यावेळी भिंगार अध्यक्ष आर.आर.पिल्ले, अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश सरचिटणीस फिरोज खान, प्रदेस सदस्य शाम वाघस्कर, भिंगार महिला अध्यक्ष मार्गरेट जाधव, माजी नगरसेवक रुपसिंग कदम, सरचिटणीस अभिजित कांबळे,
उपाध्यक्ष शशिकांत पवार, युवक काँग्रेसचे अझहर शेख, शारदा वाघमारे, जरिना पठाण, रजनी ताठे, मिना घाडगे, किरण अळकुटे, परवेझ झकेरीया, सुभाष रणदिवे आदि उपस्थित होते. या निवेदनात म्हटले आहे की, या वर्षीच्या फेब्रुवारी अखेरीस झालेला कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव काही करता कमी होत नाही, अशी आजची परिस्थिती आहे. नव्याचे नऊ दिवस या उक्तीप्रमाणे कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात गांभीर्य लक्षात घेऊन या काळात दारिद्र रेषेखालील शिधापत्रिका धारकांना 5 किलो मोफत तांदूळ दिले होते.
रु. 2 प्रतिकिलो दराने गहू व 3 रु. प्रतिकिला दराने तांदूळ एप्रिल, मे या दोन महिन्यात दिले. तसेच केसरी शिधापत्रिका धारकांनाही 8 रु. प्रतिकिलो दराने गहू व 12 रु. प्रतिकिलो दराने तांदूळ या दोन महिन्यात स्वस्त धान्य दुकानात मिळाले होते. मात्र जून महिन्यानंतर केसरी शिधापत्रिकाधारकांना स्वस्त धान्य दुकानातून तिळमात्र धान्य मिळाले नाही. वास्तविक दिवाळीपर्यंत सरसकट स्वस्त धान्य देण्याचे मान्य करुनही प्रत्यक्षात जूनपासून स्वस्त धान्य दुकानातून केसरी शिधापत्रिका धारकांना स्वस्त धान्य दिले जात नाही, ही वस्तूस्थिती आहे.
वास्तविक पाहता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी नाही, पण रोजगारासाठी लोक घराबाहेर पडले आहेत पण त्यांना दररोज रोजगार मिळतोच असे नाही. अनेक व्यवसायाला ग्राहक नाही, बाजारपेठेत सामान्यांच्या हाताला दररोज काम मिळेल, याची शाश्वती नाही, त्यामुळे सामान्य आणि मध्यमवर्गीय अद्यापही आर्थिक अडचणीत आहेत. हातावर ज्यांचे पोट आहे, त्यांचे हाल पाहाता त्यांना स्वस्त धान्य देऊन जगविणे सरकारचे कर्तव्य नाही का? कोरोना टाळेबंदीच्या काळात भल्याभल्यांची आर्थिक कंबरडे मोडली आहेत; तेव्हा हाताला रोजगार मिळेल, अशी कोणतीही योजना सरकार देऊ शकत नाही.
जर हाताला रोजगार मिळाला तर दोन वेळच्या हाता-तोंडाची लढाई कशीही साधता आली असती. मात्र आजच्या परिस्थितीत हाताला मजूरी मिळेना आणि पोटाला अन्न, अशी स्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीतून मार्ग काढायचा असेल तर स्वस्त धान्य उपलब्ध करुन देणे एवढाच पर्याय शासनासमोर शिल्लक राहतो. तरी सर्व केसरी शिधापत्रिकाधारकांना सरसकट स्वस्त धान्य उपलब्ध करुन द्यावेत, ही सुविधा कोरोना प्रादुर्भाव रोखणारी लस उपलब्ध होत नाही तोपर्यंत स्वस्त धान्य मिळावे. सर्व स्वस्त धान्य दुकाने ही दररोज खुली असायला हवी, मात्र शहरातील अनेक दुकानं सातत्याने बंद असतात.
थम्स पद्धतीने स्वस्त धान्य मिळविण्यासाठी करावयाचे अर्ज संबंधित स्वस्त धान्य दुकानात जमा करण्याचे पुरवठा खाते सूचविते मात्र, तेथेही शिधापत्रिका धारकांना सहकार्य करण्यास अनेक दुकानदार असमर्थ आहे. अशा स्वस्त धान्य दुकानादारांना सक्तीने शिधापत्रिका धारकांना सहकार्य करण्याचे तसेच सर्व दुकान दररोज खुली ठेवण्याचे सक्त आदेश द्यावेत, असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनाच्या प्रति मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, पालकमंत्री ना.हसन मुश्रिफ, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात, कॅबिनेट मंत्री शंकरराव गडाख, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, जिल्हा पुरवठा अधिकारी यांना पाठविण्यात आल्या आहेत.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved