अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2021 :- धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप करणाऱ्या गायिका रेणू शर्मा यांनी आपली तक्रार मागे घेतली आहे.
त्यावर आता अनेक प्रतिक्रिया उमटत असून हा सगळा प्रकार धक्कादायक असल्याचं भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे. धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा यांनी बलात्काराचे आरोप केल्यानंतर राज्यात खळबळ उडाली होती.
विरोधीपक्ष भाजपकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. या प्रकरणामुळे मुंडे यांच्या अडचणी वाढल्या होत्या. त्यातच रेणू शर्मा यांनी आपली तक्रार अचानकपणे मागे घेत हा आमचा कौटुंबिक वाद असल्याचं सांगितलं आहे.
मात्र, शर्मा यांच्या तक्रार मागे घेण्यामुळे भाजप नेत्या यांनी रेणू शर्मा यांना धारेवर धरत त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. “धनंजय मुंडे यांच्यावर झालेले आरोप आमच्यासाठी धक्कादायक होते.
त्याबरोबरच रेणू शर्मा यांनी तक्रार मागे घेतली तेही माझ्यासाठी धक्कादायक आहे. या प्रकरणात जे दोषी असतील त्यांना शिक्षा झाली पाहिजे.
बलात्कारासारखा गंभीर आरोप करून तो पुन्हा मागे घेणे हा काही खेळ नाही. अशा घटनांमुळे राज्यात चुकीचा संदेश जाऊ शकतो,” असे चित्रा वाघ म्हणाल्या.