ऐकलात का! चोरांना बघून पोलिसांनी ठोकली धूम,

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 29 डिसेंबर 2020 :-म्हणतात ना ‘पुणे तिथे काय उणे’. पुणे म्हणजे तिथे काहीही शक्य आहे. असाच एक अचाट प्रकार पुण्यातील जनतेने अनुभवला.

सर्वसाधारणपणे पोलिसांना बघितलं की चोर पळून जात असतात मात्र आता पुण्यात चोरांना बघून चक्क पोलिस पळून गेले असल्याची घटना घडली आहे.

सर्वसामान्य जनतेचे रक्षक असे पळपुटे होऊन गेल्याने आता सामान्य जनतेने पहायचे कुणाकडे? असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जात आहे. पुण्यातल्या औंधच्या सिद्धार्थ नगर भागात सदर घटना घडली.

शैलेश टॉवर सोसायटीमध्ये रात्री चोर आले होते. जवळपास 4 बंद असलेल्या फ्लॅटमध्ये चोरी केल्यावर चोरांचा 5व्या घरावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न चालू असताना दुचाकीवर 2 पोलिसांची तिथे एंट्री झाली.

चोरांना थोडीशी कुणकुण लागल्याने चोर निघायच्या बेतात असताना पोलिसांच्या समोर आले. आता अशा परिस्थितीत काय थरार होणार, याकडे सोसायटीचे लक्ष लागलेले होते. मात्र चोरांच्या ऐवजी पोलिसांनीच यूटर्न घेतला.

त्यापेक्षाही धक्कादायक बाब म्हणजे एक पोलीस जोरात गाडी काढून आपल्या दुसर्‍या पोलिस साथीदाराला सोडून पळाला. या संपूर्ण घटनेचे चित्रीकरण सीसीटीव्हीमध्ये मिळाले.

या घटनेची दखल आता चतुःशृंगी पोलिसांनी घेतली असून संबंधित पोलिसांचा अहवाल आयुक्तांकडे पाठवण्यात आला आहे. चोरांच्या हातातील हत्यार बघून पोलिसाने धूम ठोकली असल्याचे समजत आहे.

अहमदनगर लाईव्ह 24