अहमदनगर Live24 टीम, 25 डिसेंबर 2020 :- ‘नो मराठी नो अॅमेझॉन’ चा नारा देत महाराष्ट्र नवनिर्माण सेनाने अॅमेझॉनच्या अॅपमध्ये मराठी भाषेचा वापर करावा, अशी मागणी लावून धरली होती.
एवढेच नाही तर मनसेने मुंबईमध्ये नो मराठी नो अॅमेझॉन असे फलकच लावले होते. दरम्यान मनसे आणि अॅमेझॉनमध्ये सुरु असलेला वाद आता आणखीनच चिघळत चालला आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना नोटीस आल्यानंतर मनसे आक्रमक झाली असून पुण्यातील अॅमेझॉनच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे.
पुण्यातील कोंढवा भागातील ॲमेझोनच्या कार्यालयाची मनसे कार्यकर्त्यांकडून तोडफोड करण्यात आली आहे. यावेळी कार्यकर्त्यांकडून ‘मराठी नाय तर अॅमेझॉन नाय’ अशी घोषणाबाजी करण्यात आली.
अॅमेझॉनने मनसेच्या मराठी भाषेच्या मोहिमेविरोधात न्यायालयात धाव घेतल्यानंतर दिंडोशी कोर्टाकडून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना नोटीस बजावण्यात आली आहे.
राज ठाकरे आणि काही मनसे सचिवांना न्यायालयाने 5 जानेवारीला न्यायालयात हजर राहण्याचा आदेश दिला आहे. मनसे नेते अखिल चित्रे यांनी राज ठाकरेंना नोटीस पाठवल्यानंतर प्रतिक्रिया दिली होती.
आपण भूमिकेवर ठाम राहणार असल्याचे सांगताना यासाठी मोठी किंमत मोजावी लागेल असा इशारा न्यायालयाने नोटीस पाठवल्यानंतर मनसेने अॅमेझॉनला दिला होता. राज ठाकरेंना नोटीस पाठवणाऱ्या अॅमेझॉनला सह्याद्रीचे पाणी पाजणार, अशी प्रतिक्रिया अखिल चित्रे यांनी दिली होती.