अहमदनगर Live24 टीम, 06 फेब्रुवारी 2021:- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या राज्यातील आगमनाने राज्य सरकार जावं, अशी इच्छा भाजपा नेते नारायण राणे यांनी व्यक्त केली आहे. राणे म्हणाले, शिवसेनेशी टक्कर देण्यासाठी भाजपा समर्थ आहे.
त्यामुळे पुन्हा शिवसेनेसोबत युती करण्याचा प्रश्नच येत नाही. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपाचाच महापौर असेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
तसेच मुंबईतील गुजराती समाज हा मोदी आणि शाह यांच्याव्यतिरिक्त बिनबुडाच्या लोकांकडे जाणार नाही, अशा शब्दांत त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला.
नारायण राणे पुढे म्हणाले की, ‘पेट्रोल-डिझेलचे दर अमित शाह, नरेंद्र मोदी ठरवत नाहीत’. त्यामुळे यासाठी त्यांना जबाबदार धरता येणार नाही.
शिवसेनेची धरसोड वृत्ती असल्याचे सांगत उद्धव ठाकरे सरकार व्यवस्थित चालवतात का? असा सवालही त्यांनी केला. ज्या दिवशी ठाकरेंनी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी सरकार स्थापन केले, तेव्हाच त्यांनी हिंदुत्व सोडले.
उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वासाठी काहीही केलेलं नाही. एक ना धड भाराभर चिंध्या अशी शिवसेनेची अवस्था आहे. शिवसेनेत बाळासाहेब ठाकरेंनंतर एकही माणूस नाही ज्याने बोललेले पूर्ण करुन दाखवले, अशा शब्दांत त्यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.