अहमदनगर Live24 टीम,20 ऑक्टोबर 2020 :-नगर महापालिका अंतर्गत असणाऱ्या पार्किंगची पावती वसूल करणाऱ्या दलित तरुणास जातीवाचक शिवीगाळ केल्याचा काँग्रेसचे नगर शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्यावर फुले-शाहू-आंबेडकर चळवळीमधील विविध संघटनांनी आरोप केला आहे. तसेच त्यांना अटक करण्याची मागणी जिल्हा पोलीस प्रशासनाला केली आहे.
यासंदर्भातील निवेदनही आरपीआय (आठवले गट), आरपीआय (गवई गट), भारतीय लहुजी सेना, संत रोहिदास महाराज सेवा संघ, लहुजी शक्ती सेना, लोकशाही विचार मंच, रामवाडी मित्र मंडळ, टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य आदी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा पोलीस प्रशासनाला दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की,
‘नगर महापालिका अंतर्गत असणाऱ्या पार्किंगची पावती वसूल करणाऱ्या दलित तरुणास जातीवाचक शिवीगाळ करणारा, धमकावणारा शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण काळे यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्याची गंभीर दखल घेत किरण काळे यांना अटक करून कडक कायदेशीर कारवाई करावी असे म्हटले आहे.
दरम्यान , राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप आणि काँग्रेसच्या शहरजिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्यामध्ये असणारा जुना वाद पुन्हा नव्याने उफाळून आला आहे. काँग्रेसचे शहरजिल्हाध्यक्ष काळे यांनी यांनी जगताप समर्थकांकडून धमकावल्याचा आरोप करून पोलीस ठाण्यात तक्रार (एनसी) दिली आहे.
आपल्याविरुद्ध जाणीवपूर्वक षडयंत्र रचले जात असून नियोजनबद्धरित्या बनाव निर्माण करत शहरात महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली काँग्रेसची घोडदौड रोखण्यासाठी हा प्रकार असल्याचा आरोप काळे यांनी केला आहे.
दुसरीकडे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अभिजित खोसे यांनी म्हटले आहे, काळे केवळ प्रसिद्धीसाठी जगताप यांच्यावर आरोप करीत आहेत. मात्र, आता ते जबाबदार पदावर आहेत. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत आ. जगताप यांनी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांचा पराभव केला होता.
काळे हे थोरात व तांबे यांचे समर्थक आहेत. त्यामुळे जुन्या पराभवाचा वचपा काढण्यासाठीच थोरात व तांबे यांच्या सांगण्यावरूनच काळे हे जगताप यांच्यावर आरोप करीत आहेत. यासंबंधी आता आम्हीही राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठांकडे तक्रार करणार आहोत. तसेच कायदेशीर कारवाईही करणार आहोत, असेही खोसे यांनी म्हटले आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved