सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती पी. सी. घोष हे बनले पहिले लोकपाल
पारनेर : देशातील पहिल्या लोकपाल पदावर सरकारने सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती पी. सी. घोष यांच्या केलेल्या निवडीचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी स्वागत करतानाच ४८ वर्षांनंतर जनआंदोलनाला ऐतिहासिक विजय मिळाल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. या नियुक्तीमुळे देशात बोकाळलेल्या भ्रष्टाचाराला आळा बसेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
केंद्रीय पातळीवर लोकपाल तर राज्य पातळीवर लोकायुक्तांची नेमणूक करण्यासंदर्भात कायदा करण्याच्या मागणीसाठी अण्णांनी विविध आंदोलनांच्या माध्यमातून ८ वर्षे संघर्ष केला. लोकपाल नियुक्तीमुळे आज या संघर्षाला यश आले आहे.
न्यायालयात बाजू मांडण्यापूर्वीच सरकारकडून नियुक्ती
लोकपालसाठी आंदोलनाच्या माध्यमातून अण्णा संघर्ष करीत असतानाच त्यांचे आंदोलनातील एकेकाळचे सहकारी प्रशांत भूषण यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली.
त्यावरून, लोकपाल नियुक्तीसाठी सरकार दिरंगाई का करीत आहे, असा सवाल करत २२ मार्चपर्यंत बाजू मांडण्याचे आदेश न्यायालयाने सरकारला दिला होता.
मात्र, लोकपाल नियुक्तीला झालेल्या दिरंगाईबाबत न्यायालयात स्पष्टीकरण देण्याऐवजी लोकपालाची नियुक्ती करणे सरकारने पसंत केले.