अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2020 :- जळगावसह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात येत्या चार दिवसांत अवकाळी पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात वातावरण ढगाळ झाले आहे.
शुक्रवारी रात्रीपासून वातावरण ढगाळ झाले आहे. उत्तरेतील राज्यांमध्ये देखील गेल्या दोन दिवसांत वातावरणात बदल झाला असून काही ठिकाणी पाऊस देखील होत आहे.
राज्यात जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांत काही ठिकाणी शुक्रवारी तुरळक पावसाने हजेरी लावली. भारत हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार येत्या १५ डिसेंबरपर्यंत वातावरण ढगाळ असेल. या
काळात अवकाळी पाऊस आणि काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. अवकाळी पाऊस आणि गारपिटीच्या शक्यतेमुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे.
कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी अनेक ठिकाणी शासकीय खरेदी केंद्रावर कापसाच्या गाड्या उभ्या केल्या आहेत. पाऊस आल्यास हा कापूस ओला होण्याची शक्यता आहे.शिवाय रब्बीची पिके देखील या वादळी पावसात सापडण्याची भीती व्यक्त होत आहे.