Maharashtra News : खेड तालुक्यातील भोरगिरी ग्रामपंचायतीच्या हद्दीतील पदरवाडी येथे डोंगर जमिनीला जवळपास ३०० मीटर लांब मोठी भेग पडल्याचे समोर आले आहे. या पडलेल्या भेगेमुळे येथील वास्त्यव्यास असणाऱ्या कुटुंबीयांचे तात्पुरते स्थलांतर करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेने हालचाली सुरू केल्या आहेत.
रायगड जिल्ह्यातून कर्जत तालुक्यातून भीमाशंकरला येताना खेड तालुक्याच्या हद्दीत असणाऱ्या पदरवाडी येथे १५ आदिवासी कुटुंब राहात असून, लहान-मोठी मिळून ८० च्या आसपास येथील लोकसंख्या आहे.
येथे घरापासून १०० मीटर अंतरावर डोंगर जमिनीत मोठी भेग पडल्याचे समोर आले आहे. १ ऑगस्ट रोजी स्थानिक ग्रामस्थांनी या भेगेचे फोटो पाठविल्याने प्रांत जोगेंद्र कट्यारे यांनी याची दखल घेऊन तत्काळ घटनास्थळाची पाहणी करण्याचे निर्देश दिले.
महसूल, पंचायत समिती, वन विभाग आणि पोलिस यंत्रणेने पाहणी केली, तहसीलदार प्रशांत बेडसे, अपर तहसीलदार तथा परीविक्षाधीन उपजिल्हाधिकारी डॉ. नेहा शिंदे यांच्यासह वन विभाग, पोलिस यंत्रणा, तलाठी, ग्रामसेवक यांनी भीमाशंकर अभयारण्यातून तब्बल चार तास चालत जात पदरवाडीला भेट देऊन स्थानिकांशी संवाद साधला व परिसरातील भेगेची पाहणी केली.
या भागात संततधार पाऊस पडल्यास हा भाग खचण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडीत घडलेली दुर्घटना ताजी असताना, या घटनेची पुनरावृत्ती होण्याच्या शक्यता आहे.
पडलेल्या भेगेमुळे महसूल प्रशासनासह सर्व यंत्रणांनी तत्काळ याची दखल घेत पावसाळ्यात तात्पुरते स्थलांतर करण्यासाठी हालचाली सुरु केल्या असून, तसा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे.
महसूल प्रशासनाने या सर्व बाबींचा विचार करत पदरवाडीतील कुटुंबांना स्थलांतरित करताना पवचया घरांसह कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी भीमाशंकरच्या महादेव बन परिसरात सहमती दर्शविली. वाडाच्या मंडळ अधिकारी शारदा बढे यांनी स्थलांतर करण्याचा अहवाल वरिष्ठांकडे पाठवला आहे.