Radhanagari Dam : कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या आणि राजर्षी शाहू महाराजांच्या दूरदृष्टीतून साकारलेल्या राधानगरी येथील लक्ष्मी धरणाचे पाच स्वयंचलित दरवाजे दुपारपर्यंत उघडले गेल्यामुळे भोगावती नदीपात्रात ८५०० क्युसेक पाणी विसर्ग सुरू झाला आहे.
गेले आठ दिवस राधानगरीसह धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सतत अतिवृष्टी सुरू आहे. त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली. बुधवारी पहाटे धरण पूर्ण क्षमतेने भरून ३४७.५० फूट इतकी पाणी पातळी झाली होती.
धरणात प्रमाणापेक्षा जास्त बॅकवॉटरच्या पाण्याचा प्रवाह आल्याने सकाळी सव्वाआठ वाजता क्रमांक पाच हा स्वयंचलित दरवाजा उघडला. त्यापाठोपाठ सव्वानऊच्या सुमारास सहा क्रमांकाचा दरवाजा खुला झाला. धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढतच राहिल्याने दुपारी दीडपर्यंत तीन, चार, सात क्रमांकाचे दरवाजे उघडले.
स्वयंचलित दरवाजातून विसर्ग होणाऱ्या पाण्याचा अद्भुत आनंद लुटण्यासाठी धरणस्थळावर पर्यटकांनी प्रचंड गर्दी केली होती. गतवर्षी हेच धरण १० ऑगस्ट रोजी भरून स्वयंचलित दरवाजे उघडले होते. यंदा पंधरा दिवस आधीच धरण भरले आहे. मुळातच पाऊस सक्रिय होण्यास जून महिन्याचा शेवटचा आठवडा उजाडला.
२३ जूनपासून तुरळक पावसाला सुरुवात झाली. धरण लवकर भरते की नाही, अशी शंका व्यक्त होत असतानाच गेल्या आठ दिवसांतील मुसळधार पावसामुळे धरण पूर्ण क्षमतेने भरले आणि बुधवारी सकाळी स्वयंचलित दरवाजे उघडण्यास सुरुवात झाली.
आजअखेर एकूण २२८२ मिमी इतका एकूण पाऊस नोंदवला गेला असून, मंगळवारपासून सकाळी सहापर्यंत २४ तासांत १०६ मिलीमीटर पाऊस धरण क्षेत्रात पडला आहे.
या पाच दरवाजांतून ७१४०, तर वीजगृहातून १४०० क्युसेक पाणी विसर्ग सुरू आहे. एकूण ८५०० क्युसेक पाणी विसर्ग भोगावती नदीपात्रात सुरू आहे. त्यामुळे भोगावती नदीकाठावरील गावांना प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.