महाराष्ट्र

MSRTC News : एसटीच्या सरासरी फेऱ्यांची संख्या निम्म्याने घटली ! सोसेना प्रवाशांचा भार

Published by
Ahmednagarlive24 Office

MSRTC News : भविष्यात येणाऱ्या नव्या गाड्यांची स्वप्ने रंगवत असताना सर्वसामान्यांना वर्तमानातील एसटी प्रवास त्रासदायक ठरत आहे. एसटीच्या सरासरी फेऱ्यांची संख्या निम्म्याने घटली आहे.

मार्गातील बिघाडाचा टक्का वाढल्याने पैसे देऊन रस्त्यावर ताटकळत बसण्याची नामुष्की प्रवाशांवर ओढावत आहे. ज्युन्या गाड्यांची देखभाल व दुरुस्ती रखडणे, नव्या गाड्यांची कमतरता आणि आयुर्मान पूर्ण झालेल्या गाड्यांतून सुरु असलेली प्रवासी वाहतूक, यामुळे एसटीचे प्रवासी अनधिकृत पर्यायाकडे वळत आहेत.

सर्वसामान्य लोकांना खेड्यापासून शहरापर्यंत जोडणारी एसटीची सेवा ही एक सामाजिक बांधिलकी निर्माण करणारी सेवा असून, हक्काचे आणि सुरक्षित प्रवासाचे साधन आहे; परंतु एसटी महामंडळाकडून प्रवाशांच्या वाढत्या संख्येनुसार गाड्या उपलब्ध होत नसल्याने प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे;

परंतु उन्हाळा, दिवाळी, नाताळ, गणपती, लग्न सराई, पंढरपूर यात्रा तसेच गावोगावच्या जत्रा काळात सर्वच महामार्गावरील गाड्यांमध्ये प्रचंड गर्दी होत असून, या काळात एसटीला प्रवाशांचा भार सोसवत नसल्याने नाइलाजास्तव त्यांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

प्रवाशांना सुविधा उपलब्ध करून देण्यात महामंडळ कमी पडत आहे. ग्रामीण भागातील स्थानकावर प्रवाशांच्या सामानाची चढ उतार करणारे भारवाहक दिसेनासे झाले आहेत. हमाल नसलेल्या ठिकाणी प्रवाशांच्या सामानाची चढउतार करण्यास वाहक मदत करतील, हे बसच्या दरवाजावर लिहलेले वाक्यच गायब झाले आहे.

ग्रामीण भागातील बसस्थानके असुविधा व अस्वच्छतेच्या गर्तेत सापडली आहेत. स्थानकात उपहारगृह, पिण्याचे पाणी, प्रसाधन गृह, या मूलभूत सुविधांचीदेखील वाणवा असल्याने प्रवाशांची कुचंबना होत आहे.

याबाबत प्रवाशांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. पावसाळ्यात ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था खुपच बिकट होत असल्याने या काळात वाहतुकीचे तीन तेरा वाजत आहेत. दुर्गम भागातील वाहतूक बंद केली जाते.

बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीद असलेल्या परिवहन मंडळाच्या अनेक बसेसमधील प्रथमोपचार पेट्या व अग्निशामक यंत्रे गायब झाली आहेत. जी आहेत तिही
निकामी आहेत.

महामंडळाच्या दुर्लक्षामुळे सध्या प्रवासी खासगी वाहतुकीला प्राधान्य देताना दिसत असल्याने तोट्यात असलेल्या महामंडळाने याकडे लक्ष देण्याची नितांत गरज आहे.

Ahmednagarlive24 Office