‘आयुष्मान भारत’ देणार १० लाखांचा आरोग्य विमा ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ayushman Bharat Scheme : आपल्या महत्त्वाकांक्षी आयुष्मान भारत आरोग्य योजनेतील विम्याची रक्कम दुप्पट करण्याच्या प्रस्तावावर केंद्र सरकारकडून काम केले जात आहे. सद्यस्थितीत या योजनेअंतर्गत प्रति कुटुंब वार्षिक ५ लाखांचा आरोग्य विमा प्रदान केला जातो.

पण कर्करोग आणि अवयव प्रत्यारोपणसारख्या महागड्या आजारांत रुग्णांना अधिक मदत व्हावी, यासाठी ही रक्कम १० लाख रुपये केली जाण्याची शक्यता आहे.

१ फेब्रुवारी रोजी जाहीर केल्या जाणाऱ्या अंतरिम अर्थसंकल्पात याची घोषणा केली जाऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली. आयुष्मान भारत पंतप्रधान जनआरोग्य योजने (एबी पीएम-जेएवाय) च्या लाभार्थीची संख्या १०० कोटींवर घेऊन जाण्याची केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची योजना आहे.

यासाठी शेतकरी सन्मान निधी मिळवणाऱ्या, बांधकाम मजूर, बिगर कोळसा खाण कामगार व आशा कर्मचाऱ्यांचा समावेश येत्या तीन वर्षांत या योजनेत केला जाणार आहे. पाच लाख रुपयांपेक्षा अधिक खर्चाची आवश्यकता असलेल्या कर्करोग आणि अवयव प्रत्यारोपणसारख्या आजारांना या योजनेत आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

यासाठी आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये योजनेतील विम्याची रक्कम पाच लाखांवरून वाढून प्रति कुटुंब १० लाख रुपये करण्याच्या प्रस्तावाला अंतिम स्वरूप देण्याचे काम केले जात आहे. प्रति कुटुंब १० लाख रुपयांचे विमा कवच आणि १०० कोटी लाभार्थी झाल्याच्या स्थितीत सरकारला प्रत्येक वर्षी प्रीमियमच्या रूपात १२,०७६ कोटी रुपयांचा अतिरिक्त भार उचलावा लागेल.

उल्लेखनीय बाब म्हणजे २०१८ साली ही योजना लागू झाल्यापासून ६.२ कोटी रुग्णांनी याचा लाभ घेतला आहे. या योजनेअंतर्गत ७९,१५७ कोटींहून अधिक रुपयांचा उपचार करण्यात आला आहे. आयुष्मान कार्डधारकांच्या संख्येत उत्तर प्रदेश ४.८३ कोटी कार्डसह पहिल्या स्थानावर आहे. तर मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र अनुक्रमे ३.७८ कोटी आणि २.३९ कोटी आयुष्मान कार्डसह दुसऱ्या व तिसऱ्या स्थानावर आहे.