पक्षश्रेष्ठींचा आदेश येताच पद सोडण्याची तयारी – बाळासाहेब थोरात

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 5 जानेवारी 2021 :- पक्षांतर्गत राजकारणामुळे बाळासाहेब थोरात प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देणार असल्याच्या जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. काल बाळासाहेब थोरात यांनी दिल्लीत जाऊन काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांच्या गाठीभेटीही घेतल्याची माहिती मिळत आहे.

मात्र मी अद्याप राजीनामा दिलेला नाही, पण जर तरुणांना संधी मिळणार असेल तर मी त्यांच्या पाठीशी उभा राहिन, अशी प्रतिक्रिया बाळासाहेब थोरात यांनी दिल्लीवारीनंतर एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना दिली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदावरून राजीनामा देण्याच्या वृत्ताचं महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज स्पष्ट शब्दांत खंडन केलं. बाळासाहेब थोरात हे काल दिल्लीला गेल्यानं त्यांच्या राजीनाम्याच्या चर्चेला ऊत आला होता.

याबाबत त्यांनी स्वत: वृत्तवाहिन्याकडं बोलताना खुलासा केला आहे. ‘माझ्या राजीनाम्याची बातमी चुकीची आहे. ती कुठून आली माहीत नाही. अद्याप तरी मी राजीनामा दिलेला नाही. तशी कुठलीही चर्चा नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. मात्र, पक्षश्रेष्ठींचा आदेश येताच पद सोडण्याची तयारी असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

थोरात यांच्यावर सध्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी आहे. त्याशिवाय महाविकास आघाडी सरकारमध्ये ते महसूलमंत्री आहेत. तसंच, काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ पक्ष नेतेपदाची जबाबदारीही त्यांच्यावर आहे. एकाच व्यक्तीकडे इतक्या जबाबदाऱ्या असल्यामुळं अन्य नेत्यांमध्ये नाराजी असल्याचं बोललं जात आहे. थोरात यांनी मात्र अशी काही नाराजी नसल्याचं सांगितलं. ‘माझ्याविषयी पक्षात कुणाला व्यक्तिगत नाराजी असण्याचं कारण नाही.

मी सर्वांना बरोबर घेऊन जातोय. माझ्या परीनं प्रत्येक पदाला न्याय देण्याचा प्रयत्न करतो. पक्षात कुठलीही गटबाजी नाही. मात्र, एका व्यक्तीकडं इतक्या साऱ्या जबाबदाऱ्या आहेत. याची चर्चा निश्चित होऊ शकते. मी ते नाकारत नाही आणि माझ्या बाजूनं जबाबदाऱ्यांचं वाटप करण्यात काहीच अडचण नाही.

मी स्वत: याबद्दल आधीही पक्षाच्या नेत्यांशी बोललो आहे. पक्षाला वाटत असेल तर एखाद्या तरुण नेत्याकडं जबाबदारी द्यायला माझी हरकत नाही. आम्ही त्याच्या पाठीशी उभे राहू. नवे नेतृत्व घडवू,’ असं ते म्हणाले.

अहमदनगर लाईव्ह 24