अहमदनगर लाईव्ह 24 टीम / नागपूर :- राज्यातील मान्यताप्राप्त व अनुदानित खाजगी, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि अध्यापक विद्यालय यातील पुर्णवेळ शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांना कॅशलेस आरोग्य योजना लवकरच लागू करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री श्री.बाळासाहेब थोरात यांनी दिली.
यासंबंधीची लक्षवेधी सूचना श्री.दत्रातय सावंत यांनी मांडली. यावेळी श्री.थोरात म्हणाले, सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना वैद्यकीय प्रतिपूर्ती लागू आहे.
राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे राज्यातील मान्यताप्राप्त अनुदानित खाजगी प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, अध्यापक विद्यालय यातील पूर्णवेळ शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना
स्वत:साठी अथवा आपल्या कुटुंबियासाठी आरोग्य विभागामार्फत मान्यता दिलेल्या 27 आकस्मिक व 5 गंभीर आजारावरील उपचारार्थ आंतरुग्ण कालावधी झालेल्या वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती शासनाकडून करण्यात येते.
ही खर्च प्रतिपूर्ती आता कॅशलेस स्वरुपात करण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरु आहे. या चर्चेत सदस्य सर्वश्री डॉ.रणजीत पाटील, श्रीकांत देशपांडे, निरंजन डावखरे, बाळाराम पाटील, श्रीमती मनीषा कायंदे यांनी सहभाग घेतला.