अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2021 :-प्रदेशाध्यक्षपद घ्यायला कोणी तयार नव्हते. त्या वेळी बाळासाहेब थोरात यांनी जबाबदारी स्वीकारली व काँग्रेसचे ४४ आमदार निवडून आणले. परिणामी, आज आपण सत्तेत आहोत.
म्हणून थोरातच प्रदेशाध्यक्षपदी राहिले पाहिजेत. पुढच्या वेळी आपले सरकार बनवल्याशिवाय ते राहणार नाहीत, अशी जाहीर भूमिका महिला व बालविकासमंत्री यशोमती ठाकूर यांनी मांडली.
महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या नवनियुक्त अध्यक्ष संध्या सव्वालाखे यांचा पदग्रहण सोहळा प्रदेशाध्यक्ष थोरात यांच्या उपस्थितीत शुक्रवारी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे पार पडला.
त्या वेळी ठाकूर बोलत होत्या. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांची प्रदेशाध्यक्षपदावर वर्णी लागणार असल्याचे निश्चित झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर ठाकूर यांच्या वक्तव्याला महत्व प्राप्त झाले आहे.
थोरात यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदासह काँग्रेस विधीमंडळाचे गटनेतेपद व मंत्रिपद अशी तिहेरी जबाबदारी आहे. त्यामुळे थोरात यांच्याकडून प्रदेशाध्यक्षपद काढून घेण्याची हालचाली पक्षात सुरू आहेत.
महाराष्ट्र प्रभारी एच के पाटील यांनी मध्यंतरी मंत्री, आमदार व जिल्हाध्यक्ष यांची मते जाणून घेतली होती. यावेळी बहुतांश मंत्री, आमदारांनी थोरात यांच्याकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी प्रदेशाध्यक्षपद काढून घेण्याचे औचित्य नाही, अशी भूमिका मांडली होती. त्यानंतरही पाटील यांनी थोरातांना प्रदेशाध्यक्षपदावरून हटविण्यासाठी हालचाली चालू ठेवल्या असल्याचे दिसत आहे.