बळीराजा संतापला; नुकसानभरपाई मिळाली नाही तर आंदोलन करणार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2020 :-कोणत्याही शेतकर्‍याला वार्‍यावर न सोडता तातडीने शासकीय मदत दिली जाईल, अशी घोषणा दस्तूरखुद्द मुख्यमंत्र्यांनी केली होती. सरकारच्या पाहणी पथका नंतर बाधीत पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले.

सगळे सण आले आणि गेलेही तरी देखील शेतकर्‍यांना अद्यापपर्यंत अतिवृष्टीचे पैसे न मिळाल्याने शेतकर्‍यांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

शिमगा करण्याची वेळ आली आहे. आठ दिवसात शेतकर्‍यांना नुकसान भरपाईची रक्कम मिळाली नाही तर सरकार विरोधात तिव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा परिसरातील शेतकर्‍यांनी दिला आहे. सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्या दरम्यान अतिवृष्टी झाल्याने शेतकर्‍यांचे बाजरी, सोयाबीन,

कपाशी, भुईमूग, मका आदी खरीप पिकांसह ऊस पिकाचे अतोनात नुकसान झाले होते. शेतकर्‍यांचे झालेले नुकसान बघण्यासाठी महाआघाडी सरकारचे मंत्र्यासह मुख्यमंत्रीही बाहेर पडले होते. या मंत्री महोदयांनी शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन बाधीत पिकांची पाहणी करुन शेतकर्‍यांच्या व्यथा ऐकून घेतल्या व आलेल्या

नैसर्गिक संकटाचा सामना करण्यासाठी महाआघाडी सरकार शेतकर्‍यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. शेतकर्‍यांना नुकसान भरपाई देण्यासाठी वेळ पडली तर कर्ज काढू, पण शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडणार नाही, अशा वल्गना करणार्‍या महाआघाडी सरकारने शेतकर्‍यांची थट्टा केली आहे.

दिवाळीच्या आगोदर निम्मे पैसे व दिवाळीनंतर निम्मे पैसे देण्याची घोषणा मंत्री वड्डेटीवार यांनी केली होती. दिवाळीला देखील पंधरा दिवस उलटून गेले आहेत. तरी देखील ना पीकविमा ना सरकारी मदत, त्यामुळे शेतकर्‍यांवर शिमगा करण्याची वेळ आली असून खरंच हे शेतकर्‍यांचे सरकार आहे का? असा प्रश्न शेतकर्‍यांना पडला आहे.

शासनाने आठ दिवसात अतिवृष्टीची रक्कम शेतकर्‍यांना न दिल्यास तिव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा राजेंद्र लोंढे, शहाजी कदम, सोपानराव शेटे, भगवानराव गडाख, दिलीपराव मुसमाडे, अर्जुनराव मुसमाडे, अशोकराव शेटे, गंगाधर खांदे आदींसह संतप्त शेतकर्‍यांनी दिला आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24