अहमदनगर Live24 टीम, 6 नोव्हेंबर 2020 :- शहर स्वच्छतेसाठी अहोरात्र झटणाऱ्या नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यास मारहाण झाल्याची घटना कर्जतमध्ये घडली आहे. दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ नगरपंचायत कर्मचारी आणि घंटागाडी चालक यांनी कामबंद आंदोलन पुकारले आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी कि , कर्जत शहरातील बाजारतळावरील शौचालय साफ करण्यासाठी नगरपंचायत कर्मचारी व घंटागाडीचालक पद्माकर पिसाळ आज सकाळी पाण्याचा टॅंकर घेऊन गेले होते. शौचालय स्वच्छ करीत असताना,
तेथे एक जण वाहनातून आला. मात्र, टॅंकरमुळे त्याला जाण्यासाठी रस्ता नसल्याने पिसाळ यांनी तेथील केळीची हातगाडी बाजूला घेऊन रस्ता करून दिला. मात्र, त्याने संबंधिताचे समाधान झाले नाही.
त्याने पिसाळ यांना शिवीगाळ व मारहाण केली. दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ कर्मचाऱ्यांनी “काम बंद’ आंदोलन केले. दोषींवर कारवाईच्या मागणीसाठी नगरपंचायतीपुढे धरणे आंदोलन केले.
नगराध्यक्ष प्रतिभा भैलुमे, उपनगराध्यक्ष नामदेव राऊत, मुख्याधिकारी गोविंद जाधव यांनी कामगारांशी चर्चा करून आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. दुपारनंतर काम पूर्ववत सुरू झाले.
आंदोलनात संतोष समुद्र, बापू उकिरडे, राकेश गदादे, विलास शिंदे, सुनील नेवसे, नितीन गलांडे, नाना कचरे, गजानन नेटके, किशोर भैलुमे आदींनी भाग घेतला.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved