अहमदनगर लाईव्ह 24 टीम / पाथर्डी :- तालुक्यातील कारेगाव येथे वर्षश्राद्ध कार्यक्रमात अचानक आग्यामोहोळाच्या मधमाशा हल्ल्यात पंचवीस ते तीस जण जखमी झाले. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यापैकी अमोल खेडकर यांची यात प्रकृती गंभीर असल्याने समजते.
कारेगाव येथे मोहटादेवी रोडवर मूकबधिर विद्यालयाच्या समोर वडाच्या झाडाखाली वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम सुरू होता. कार्यक्रमातील पूजेत लावण्यात आलेल्या अगरबत्तीच्या धुराने वडाच्या झाडाच्या फांदीला असलेले आग्यामोहोळ चौताळून उठले व तेथील लोकांवर हल्ला केला.
अचानकच मधमाशा चावू लागल्याने एकच धावपळ उडाली. यातील अनेकांनी जवळच असलेल्या मूकबधिर विद्यालयाचा आधार घेतला. या कार्यक्रमाला जवळजवळ अडीचशे ते तीनशे लोक उपस्थित होते त्यापैकी २५ ते ३० जणांना जास्त प्रमाणात मधमाशा चावल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावे लागले.
यातील बहुतांश जणांना डॉक्टरांनी प्रथम उपचार करून सोडून दिले. मात्र नाथनगरमध्ये राहणारे अमोल खेडकर यांना जास्त मधमाशा चावल्याने त्यांच्यावर अहमदनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती रघुनाथ घुगे यांनी दिली.