Maharashtra News : पैसे नको असे कुणी म्हणणांर नाही. पैसे तर सर्वानाच हवे असतात. परंतु दहा रुपयांच्या नाण्याच्या नशिबी मात्र नकार घंटा मात्र कायम आहे. जसे हे नाणे चलनात आले आहे तसे याबाबत विविध अफवा उठवल्या गेल्या. सन २००९ मध्ये हे नाणे चलनात आले.
रिझर्व्ह बँकेने याबाबत अनेकदा विविध सूचना काढल्या परंतु तरीही दहा रुपयांचे नाणे स्वीकारले जात नाही. किरकोळ व्यावसायिक, रिक्षाचालक, भाजी विक्रेते असोत कि अगदी ग्राहक ते दहा रुपयांचे नाणे चालत नसल्याचे सांगून ते घेण्यास नकार देत आहेत.
एकप्रकारे चलनातील नाण्याला बाद ठरविले जात आहे. परंतु आता असे करून चालणार नाही. याचे कारण असे की पोलीस आता ऍक्शनमोड वर आले आहेत.
दहा रुपयांच्या नाण्यांवरून वाद
अहमदनगर शहरासह जिल्ह्यात अनेकजण दहा रुपयांचे नाणे स्वीकारत नाहीत. त्यावरून व्यावसायिक व ग्राहकांमध्ये बऱ्याचदा वादही होतात. आम्ही जर दहा रुपयांचे नाणे घेतले, तर ते आमच्याकडून ग्राहक घेत नाहीत.
त्यामुळे ही नाणी अंगावर पडतात, असे सांगून पुरावा म्हणून काही दुकानदार त्यांच्याकडील संग्रहित दहा रुपयांचे नाणे दाखवितात. ही स्थिती केवळ अहमदनगर मधील नाहीतर राज्यातील अनेक भागात आहे. अनेकदा, दुकानदार, भाजीविक्रेते यांत व ग्राहकांच्यामध्ये अनेकदा यामुळे वाद देखील होतात.
कलम १२४ अन्वये राष्ट्रद्रोहाचा गुन्हा
चलनात असणारे नाणे कुणी स्वीकारत नसेल तर यावर देखील कायदा आहे. रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक सूचनेनुसार चलनातील वैध नाणे स्वीकारण्यास कोण नकार देत असल्यास त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई होऊ शकते. कलम १२४ अन्वये राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल होऊ शकतो असा कायदा आपल्याकडे आहे.
नाणे न स्वीकारल्यास तीन वर्षाचा कारवास
अहमदनगरचे जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी सांगितलं आहे की, चलनातील नाणी न स्वीकारणाऱ्यांची माहिती पोलिसांना दिल्यास त्या व्यक्तींवर गुन्हा दाखल होऊ शकतो.
हा गुन्हा सिद्ध झाल्यास संबंधितास दंडासह तीन वर्षाचा कारवास देखील होऊ शकतो. दहा रुपयांचे नाणे न स्वीकारण्याबाबत पोलिस ठाण्यात तक्रार करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.