Bhandardara Tourism : नाशिक पर्यटन विभागाकडुन महाराष्ट्र शासनाचा भंडारदऱ्यात आयोजित करण्यात आलेला ‘वर्षा पर्यटन महोत्सव’ स्थानिक नागरीकांनी बंद पाडला असून स्थानिकांना विश्वासात न घेता हा कार्यक्रम भंडारदरा येथे आयोजित करण्यात आल्याचा आरोप होत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, नाशिक पर्यटन संचालनाकडुन भंडारदरा येथील वसाहतीमध्ये शनिवारी (दि. १२) ऑगस्ट १५ ऑगस्ट दरम्यान ‘वर्षा पर्यटन महोत्सव’ आयोजित करण्यात आला होता. या महोत्सवाची गत पंधरा ते वीस दिवसांपासून भंडारदरा गावाच्या घाटघर उदचन प्रकल्पाच्या वसाहतीमध्ये पुर्वतयारी सुरु होती.
हा महोत्सव सुरु करण्यासाठी नाशिक पर्यटन संचालनालयाकडून कोणतीही पुर्व परवाणगी भंडारदरा गावच्या ग्रामपंचायतीकडुन घेण्यात आली नव्हती. तसेच स्थानिक नागरीक, व्यापारी यांनाही विश्वासात न घेता परस्पर महोत्सव आयोजित करण्यात आला होता.
त्यामुळे भंडारदरा गावच्या सरपंच अनिता विनायक खाडे यांच्या अधिपत्याखाली गावामध्ये बैठक घेऊन सदर महोत्सवाला परवाणगी नाकारण्यात आली. सदर कार्यक्रम परवाणगी घेऊनच पुढील काही दिवसानंतर सुरु करावा, असे ग्रामपंचायतच्या वतीने वर्षां महोत्सव आयोजकांना कळविण्यात आले.
जर अगोदरच आम्हाला या कार्यक्रमाविषयो कळविण्यात आले, तर आमच्या आदिवासी तरुणांना रोजगार उपलब्ध झाला असता. तसेच गावातील बचतगटही या वर्षा महोत्सवामध्ये सामिल झालेल्या विविध कार्यक्रम सहभागी होऊ शकले असते, असे भंडारदरा गावच्या सरपंचाकडुन सांगण्यात आले.
वर्षा महोत्सवाच्या आयोजक असलेल्या पर्यटन संचालनालयाच्या मधुमती सरदेसाई यांनी मात्र पुढील कार्यक्रम भंडारदरा गावच्या ग्रामपंचायतीची परवाणगी घेऊन करणार असल्याचे सांगितले.
हा कार्यक्रम पुर्वनियोजित असल्याने आदिवासी भागातून विविध कलापथके नियोजित स्थळी काल शनिवारी सकाळी दहा वाजल्यापासुन उपस्थित होती. दुपारी तीन वाजता गाजावाजा न करता मधुमती सरदेसाई यांनी उरकते उद्घाटन करुन फोटोशेसन घेतले.