अमरावती :- हैदराबादमधील डॉ. प्रियंका रेड्डी या तरुणीवर बलात्कार करून तिला जाळून मारण्यात आले. या लाजिरवाण्या घटनेच्या विरोधात तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या निवासस्थानासमोर निदर्शने करत असताना महिला कार्यकत्र्या तथा ‘भूमाता ब्रिगेड’च्या संस्थापक तृप्ती देसाई यांना अटक करण्यात आली आहे.
यावेळी त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनाही ताब्यात घेतलेले आहे. हैदराबाद येथे प्रियंका रेड्डी या डॉक्टर तरुणीवर बलात्कार करून तिच्यावर पेट्रोल टाकून जाळून मारण्यात आले. या लाजिरवाण्या घटनेचा संपूर्ण राज्यातच नव्हे, तर देशभरात विरोध केला जात आहे.
याचाच एक भाग म्हणजे महाराष्ट्रातील महिला कार्यकत्र्या तथा ‘भूमाता ब्रिगेड’च्या संस्थापक तृप्ती देसाई या घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या निवासस्थानासमोर पोहोचल्या आणि येथे आपल्या कार्यकर्त्यांसोबत निदर्शने सुरू केली.
यानंतर हैदराबाद पोलिसांनी तृप्ती देसाईंसह त्यांच्या कार्यकर्त्यांना अटक केली आहे. यावेळी बोलताना तृप्ती देसाई म्हणाल्या की, तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्याकडे लग्नाला जायला वेळ आहे; परंतु पीडित तरुणीच्या परिवाराकडे जाण्यासाठी किंवा त्यांना भेटण्यासाठी वेळ नाही. ही गोष्ट दुर्दैवी असल्याचे देसाईंनी म्हटलेले आहे.