अहमदनगर Live24 टीम, 25 जानेवारी 2021 :- कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत खळबळ उडाली आहे. अलीकडेच जाहीर करण्यात आलेल्या नियुक्त्यांमुळे मनसेमध्ये मोठा पेच निर्माण झाला आहे.
स्वार्थासाठी पक्ष सोडून जाणाऱ्यांना व निवडणूक डोळ्यासमोर ठेवून पुन्हा पक्षात येणाऱ्यांना मोठी पदे दिली गेल्याने कल्याण पूर्वेतील मनसे पदाधिकाऱ्यांमध्ये कमालीची नाराजी पसरली आहे. त्यामुळे उपशहराध्यक्ष, विभागीय संघटक,
विभाग अध्यक्ष, उपविभाग अध्यक्ष, शाखा अध्यक्ष, उपशाखाध्यक्ष, गट अध्यक्ष अशा एकूण 320 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहे. माजी नगरसेवक अनंता चंदर गायकवाड यांनी मनसेत पुन्हा प्रवेश केला आहे.
त्यांना पक्षाकडून कल्याण पूर्व विधानसभा अध्यक्षपद देण्यात आलं आहे. पक्षात गेल्या कित्येक वर्षांपासून काम करणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून गायकवाड यांना कल्याण पूर्व विधानसभा अध्यक्षपद देण्यात आल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणखी काही माजी नगरसेवक मनसेच्या वाटेवर असून त्यांना पुन्हा पक्षातर्फे मोठी जबाबदारी देऊन निष्ठावंताना डावलण्याची शक्यता आहे.
त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे, अशी माहिती प्रसार माध्यमांकडे आली आहे. दरम्यान, पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या राजीनाम्यांबाबत मला काहीही कल्पना नाही. मी पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला होता.
ज्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहे, त्यांनी पक्ष वाढवण्यासाठी काय काम केले आहे, असा सवालच माजी नगरसेवक आणि विधानसभा कल्याण पूर्व अध्यक्ष अनंता गायकवाड यांनी केला आहे.