अहमदनगर Live24 टीम, 09 डिसेंबर 2020 :-तब्बल ७ कोटी रूपयांचा ग्लोबल टिचर अवॉर्ड जिंकणारे बार्शीतील झेडपी शिक्षक रणजितसिंह डिसले गुरूजी हे बुधवारी सकाळी कोरोना चाचणीत पॉझिटिव्ह निघाले.
रणजितसिंह डिसले गुरुजी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानं एकच खळबळ उडाली आहे. ग्लोबल टिचर पुरस्कार विजेते डिसले गुरुजींना कोरोनाची लागण झाली आहे. आपली कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून माझ्या संपर्कात आलेल्या मंडळींनीही कोरोना टेस्ट करून घ्यावी.
कोणतीही रिस्क घेऊ नये’, अशी विनंती डिसले यांनी केली आहे.गावी आल्यानंतर त्यांना लक्षणे दिसून येत असल्याने डिसले गुरूजींनी घरातल्या सर्वांची कोरोना तपासणी केली त्यात ते स्वत: व त्यांची पत्नी कोरोना पॉझिटिव्ह आले. बाकीच्या घरातील सर्व मंडळींचा चाचणी अहवाल निगेटिव्ह आला.
मागील काही दिवसांपूर्वी डिसले गुरुजी मुंबईत आले होते. मुंबईत त्यांनी अनेक नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, परिवहन मंत्री अनिल परब आणि पर्यावरण आदित्य ठाकरे, राज ठाकरेंची भेट घेतली होती.
तसेच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यासह इतर नेत्यांच्याही त्यांनी भेटीगाठी घेतल्या होत्या. त्यातूनच त्यांना कोरोनाची लागण झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. युनेस्को आणि लंडनस्थित वार्की फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ग्लोबल टिचर प्राईझ जाहीर झाला असून
सोलापूरच्या परितेवाडी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांना 7 कोटी रुपयांचा हा पुरस्कार जाहीर झाला होता. लंडनमधील नॅचरल हिस्ट्री म्युझियममध्ये झालेल्या समारंभात सुप्रसिद्ध अभिनेते स्टीफन फ्राय यांनी पुरस्काराची अधिकृत घोषणा केली होती.
असा पुरस्कार मिळणारे ते पहिलेच भारतीय शिक्षक ठरले आहेत. रणजितसिंह डिसले यांना पुरस्कार जाहीर झाल्यानंतर संपूर्ण महाष्ट्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांनी पुरस्कारातील एकूण रकमेपैकी 50 टक्के रक्कम त्यांच्यासोबत नामांकन मिळालेल्या पहिल्या 9 शिक्षकांना देण्याची घोषणा त्यांनी केली होती.