अहमदनगर Live24 टीम, 20 मार्च 2021:- रेखा जरे हत्याकांडातील मुख्य आरोपी बाळ ज. बोठे याच्या पोलिस कोठडीत वाढ झाली आहे. बोठेला न्यायालयासमोर हजर केले असता त्याला आणखी तीन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.
यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा व सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी बाळ बोठे याच्या पोलिस कोठडीची मुदत संपत असल्याने पोलिसांनी त्याला शनिवारी दुपारी न्यायालयासमोर हजर केले होते. यावेळी न्यायालयाने आरोपी बोठेला 23 मार्चपर्यत पोलिस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांनी तपासासाठी पोलिस कोठडीत वाढ करण्याची मागणी केली. त्यानुसार न्यायालयाने २३ मार्चपर्यत पोलिस कोठडीची वाढ केली. आरोपी बाळ बोठेचा आयफोन अजून उघडलेला नाही.
हत्येचे कारण समोर आलेले नाही, त्यामुळे आरोपीला आठ दिवसांची पोलिस कोठडी वाढवून मिळावी, अशी सरकारी पक्षाच्या वतीने मागणी करण्यात आली होती. सरकारी पक्षाच्यावतीने अँड. मनीषा डुबे पाटील यांनी युक्तिवाद केला तर आरोपी पक्षाच्यावतीने अँड. महेश नवले यांनी युक्तिवाद केला.
शनिवारी (दि.१३ मार्च) बाळ बोठे याच्यासह अन्य आरोपींना पोलिसांनी हैदराबाद येथून अटक केली होती. बाळ बोठे हत्याकांडानंतर फरार होता.