महाराष्ट्र

राज्यभरात कांद्याच्या दरात मोठी घसरण ! बाजार समितीच्या कार्यालयात कांदे फेकून आंदोलन

Published by
Ahmednagarlive24 Office

Maharashtra News : केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यात शुल्कात ४० टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतल्याने सोलापूरसह राज्यभरात कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत प्रतिक्विंटलमागे २०० रुपयांनी दर घसरले. याकडे लक्ष वेधण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बाजार समितीच्या कार्यालयात कांदे फेकून आंदोलन केले.

मंगळवार, २२ ऑगस्ट २०२३ रोजी प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयात जाऊन केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात घोषणाबाजी केली.

निर्यात शुल्क वाढीचा निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावा. अन्यथा यापेक्षा उग्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशाराही देण्यात आला. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव दत्तात्रय सूर्यवंशी यांच्याकडे देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की,

गेल्या आठ दिवसापासून कांद्याच्या दरात वाढ होत होती. त्यामुळे शेतकऱ्यांना काहीअंशी दिलासा मिळत होता. परंतु अशास्थितीत केंद्र सरकारने कांदा निर्यात शुल्कात ४० टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय घेतला.

सोमवारच्या तुलनेत मंगळवारी आवक वाढली

सोमवार, २१ ऑगस्ट २०२३ रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीत १०८ ट्रक्समधून कांद्याची आवक झाली. प्रति क्विंटलसाठी १०० ते ३५०० रुपये असे दर होते. मंगळवार, २२ ऑगस्ट २०२३ रोजी कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली.

एकूण १४२ गाड्यांमधून कांद्याची आवक झाली. प्रतिक्विंटल १०० ते ३३०० रुपये असे दर होते. सोमवारच्या तुलनेत मंगळवारी प्रतिक्विंटलमागे २०० रुपयांची घसरण झाली होती.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office