अहमदनगर Live24 टीम, 15 एप्रिल 2021 :- देशात सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने अनेक ठिकाणी लॉकडाऊन किंवा कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्याचा परिणाम आता रोजगारांवर होत असल्याचे समोर आले आहे.
कार्यालये, दुकाने, कारखाने आदी सर्वांना याचा फटका बसत असून शहरांसह ग्रामीण भागातही हाताला काम मिळत नसल्याने सध्या आणि आगामी काळातही रोजगाराचे भीषण संकट ओढावणार आहे.
देशातील शहरी भागातील बेरोजगारी वाढून जवळपास १० टक्क्यांवर गेली आहे.सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (सीएमआयई) या संस्थेने देशातील रोजगारासंदर्भातील भीषण वास्तव मांडणारी आकडेवारी जाहीर केली आहे.
त्यानुसार ११ एप्रिलला संपलेल्या आठवड्यात शहरी बेरोजगारीचा दर ९.८१ टक्के झाला. २८ मार्चला संपलेल्या आठवड्यात तो ७.७२ टक्के, तर संपूर्ण मार्चमध्ये ७.२४ टक्के होता.
केवळ शहरीच नव्हे तर ग्रामीण बेरोजगारीतही मागील दोन आठवड्यांत वाढ झाली आहे. या काळात ग्रामीण बेरोजगारीचा दर ६.१८ टक्क्यांवरून ८ टक्क्यांवर गेला आहे.
२८ मार्च रोजी संपलेल्या आठवड्यात राष्ट्रीय बेरोजगारीचा दर ६.६५ टक्के होता. ११ एप्रिलला संपलेल्या आठवड्यात तो वाढून ८.५८ टक्क्यांवर गेला.
पुन्हा लॉकडाऊन लागल्यास श्रम बाजारात आणखी घसरण होईल. अर्थव्यवस्थेलाही मोठा फटका बसेल, असे सांगण्यात येत आहे.