अहमदनगर Live24 टीम, 24 सप्टेंबर 2021 :- कोरोनामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून शिक्षण व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. राज्य सरकारकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेल्या शाळा अखेर सुरू करण्याचा निर्णय़ घेण्यात आलेला आहे.

त्यानुसार राज्यभरातील शाळा आता ४ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत. शाळा सुरू करण्यास मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिली आहे. आज दुपारी वर्षा गायकवाड यांनी त्यासंदर्भात घेतलेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे.

त्यांनी सांगितल्यानुसार, ४ ऑक्टोबरपासून राज्यातील ग्रामीण भागात ५वी ते १२वी चे वर्ग सुरू होणार आहेत. त्यासोबतच, शहरी भागात ८वी ते १२वीचे वर्ग सुरू होतील.

यासाठी टास्क फोर्स आणि राज्य सरकारने मिळून बनवलेली नियमावली सर्व शाळा, पालक आणि विद्यार्थ्यांना बंधनकारक असणार आहे.

आपण ७ जुलै २०२१ रोजी जीआर काढला होता की जे ग्रामीण भाग कोरोनामुक्त झाले आहेत, तिथे ८ वी ते १२वीच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. १५ जुलैपासून त्या शाळांना परवानगी दिली होती.

त्यानुसार शाळा सुरू झाल्या होत्या. त्यानुसार एसओपीही दिल्या होत्या. नंतर ग्रामीण भागात ५वी ते ८वी आणि शहरी भागात ८वी ते १२वी पर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता.

१० ऑगस्ट रोजी त्याच्या एसओपी देखील जाहीर केल्या होत्या. त्यानंतर यावर मंत्रिमंडळात चर्चा झाली. शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांशी चर्चा केल्यानंतर आमच्या एसओपींमध्ये अजून काही सूचना दिल्या, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या.

शाळा सुरू करण्याबाबत मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या असून, महापालिका क्षेत्रासाठी आयुक्तांच्या, नगरपालिका, नगरपंचायत, ग्रामपंचायत स्तरासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करण्याच्या, शिक्षकांचे लसीकरण करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.