मोठी बातमी : सीरम इन्स्टिट्यूला लागलेल्या आगीत तब्बल एक हजार कोटींचं नुकसान !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2021 :-सीरम इन्स्टिट्यूटमध्ये काल लागलेल्या आगीत एक हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक नुकसान झालं असल्याची माहिती सीरमचे सर्वेसर्वा अदर पूनावाला यांनी दिली आहे.

तसेच खासकरुन सप्लायवर परिणाम झाला असल्याचं अदर पुनावाला यांनी सांगितलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सीरमच्या आग लागलेल्या नव्या इमारतीची पाहणी केली.

त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी मीडियाने आदर पुनावाला यांनाही काही प्रश्न विचारले असता त्यांनी ही माहिती दिली.

सीरमला लागलेल्या कालच्या आगीत एक हजार कोटींचं नुकसान झालं आहे. इमारतीतील साहित्य जळून खाक झालं आहे. बीसीजी लस आणि रोटाव्हायरसचंही मोठं नुकसान झालं आहे, असं आदर पुनावाला यांनी स्पष्ट केलं आहे.

तसेच कोव्हिशिल्ड लस दुसऱ्या ठिकाणी होती. त्यामुळे या लस सुरक्षित आहेत. तसेच या लसीच्या उत्पादनावरही कोणताही परिणाम झालेला नाही. ज्या ठिकाणी आग लागली तिथे कोणत्याही व्हॅक्सिनची निर्मिती होत नव्हती.

केवळ भविष्यात या ठिकाणी लस ठेवण्यासाठी या इमारतीचं काम सुरू होतं, असंही त्यांनी स्पष्ट केलं. या आगीत काल पाच कामगारांचा मृत्यू झाला आहे. या कामगारांना आर्थिक मदत करण्याची माझ्या वडिलांनी घोषणा केली आहे,

असंही त्यांनी सांगितलं. तर, गरज पडल्यास राज्य सरकारही या मृत कामगारांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सीरम इन्स्टिट्यूटच्या घटनास्थळास भेट देऊन पाहणी केली. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील,

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, खा. गिरीश बापट, आ. चेतन तुपे, सीरम इन्स्टिट्यूटचे अदर पुनावाला पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता उपस्थित होते.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24