महाराष्ट्र

महावितरणकडून बिलातील हप्ता सवलत बंद; सामन्यांची अडचण ! भरावे लागतेय एकरकमी बिल; सवलत सुरू करण्याची मागणी

Published by
Ahmednagarlive24 Office

Maharashtra News : थकीत बीज बिल असो किंवा जास्तीचे बिल, त्याचा भरणा करण्यासाठी महावितरणकडून हप्ते पाडून दिले जात होते. त्यामुळे ग्राहकांना हे बिल भरण्यासाठी वेळेची सवलत मिळत होती; मात्र राज्यातील सामान्य ग्राहकांसाठी असलेली ही सवलतीची पद्धत महावितरणने फेब्रुवारीपासून बंद केली आहे.

त्यामुळे गोरगरिब ग्राहकांवर मोठा आर्थिक भार पडणार असल्याने त्यांच्या आर्थिक अडचणीं वाढणार आहेत. ही सवलत पुन्हा सुरू करावी, अशी मागणी सामान्य ग्राहकांकडून केली जात आहे.

महावितरणकडून वीज ग्राहकांसाठी बिल भरण्यासाठी सवलत दिली जात होती. दरमहा हजार दोन हजार वीजबिल भरू न शकणाऱ्या सामान्य, गरीब ग्राहकांसाठी महावितरणने टप्पा पद्धत सुरू केली होती. ग्राहक महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून बिलाचे टप्पे पाडून घेत असत.

थकबाकीचा आकडा वाढतच गेला, तर तो ग्राहकांसाठीही त्रासाचा आणि वसुलीसाठी महावितरणला कसरतीचा होईल, हे लक्षात आल्यावर फेब्रुवारीपासून टप्पा पद्धत बंद केली आहे. शहर व जिल्ह्यात पतसंस्था, सहकारी बँकांसोबतच इतर अनेक खासगी वीज बिल भरणा केंद्रे आहेत. तेथील ही पद्धत बंद करण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकांना एकरकमी वीजबिल भरणा करावा लागत आहे.

मार्चअखेर असल्याने आता सर्वच विभाग वसुलीवर भर देताना दिसत आहेत. त्यात महावितरणचाही समावेश आहे. यात मोठ्या ग्राहकांवर अधिक लक्ष दिले जात असले, तरी सामान्य ग्राहकांसाठी टप्पा पद्धत महावितरणकडून बंद झाल्याने गोरगरीब ग्राहकांवर बिल भरण्यासाठी मोठा भार पडणार आहे.

जसे हाती पैसे येतील, तसे ते बिलाचा भरणा करत होते. यातून गोरगरिब ग्राहकांना दिलासा मिळत होता. महावितरणच्या अधिकृत मोबाईल अॅपवरूनही टप्पा पद्धतीने ग्राहक वीज बिल भरणा करत होते. या पद्धतीमुळे सर्वसामान्य ग्राहकांना सवलत मिळत होती व महावितरणचे बिलही भरले जात होते.

ग्रामीण भागात पूर्ण दाबाने वीज मिळत नसल्याने आधीच महावितरणविरोधात नाराजी आहे. त्यातच बिलाचा भरणा एकरकमी करावा लागत असल्याने सर्वसामान्य ग्राहकांच्या अडचणींत वाढ झाली आहे. त्यामुळे महावितरणने ही सवलतीची टप्पा पद्धत पुन्हा सुरू करावी, अशी मागणी सर्वसामान्य ग्राहकांकडून होत आहे.

■वीज चोरी वाढणार… फेरविचार करावा

महावितरणची वीज बिलातील टप्पा पद्धत बंद झाल्याने सामन्य ग्राहकांवर आर्थिक बोजा पडणार आहे. त्यामुळे हातात एकरकमी पैसे न आल्यास कनेक्शन कट होणार आहे. परिणामी अनधिकृत वीज वापर वाढून वीज चोरी वाढणार असल्याने महावितरणचे नुकसानच होणार आहे. त्यामुळेया निर्णयाचा फेरविचार करून सामन्य ग्राहकांसाठी सवलत देणारी टप्पा पद्धत पुन्हा सुरू करावी. – रणजित बनकर, अध्यक्ष, पढेगाव सेवा सोसायटी

■सेवाही तशी द्यावी

वीज बिल वसुली झाली पाहिजे, याबाबत कुणाचेही दूमत असण्याचे कारण नाही; परंतु यात र गरीब व्यक्ती भरडला जाऊ नये, अशी अपेक्षा गोर ठेवायला कुणाचीही हरकत नसावी. जर ग्राहकांनी वीज बिल वेळेवर भरावे, अशी महावितरणची अपेक्षा असेल, तर सेवाचा दर्जाही महावितरणने ठेवला पाहिजे किंवा त्यात किमान सुधारणा तरी केली पाहिजे. – सुनिल मगर, ‘बसपा’ श्रीरामपूर विधानसभा अध्यक्ष

■ सामान्य वीज ग्राहकांची गैरसोय होऊ नये, यासाठी महावितरणच्याकडून टप्पा पद्धत कार्यरत होती. याचा फायदा अत्यल्प सामान्य ग्राहक घेत होते. परंतु, इंडस्ट्रीयल ग्राहकांची बिले मोठी असल्याने ते परस्पर ऑनलाईन पद्धतीने टप्पा पद्धतीचा फायदा घेत होते, त्यामुळे थकबाकी वाढत असल्याचे लक्षात आल्याने महावितरणकडून टप्पा पद्धत बंद करण्यात आली आहे. – शिरीष वाणी, सहाय्यक अभियंता, बेलापूर विभाग

Ahmednagarlive24 Office