अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आम्ही पाथरीचा साईबाबा जन्मभूमी, असा उल्लेख करून त्याचा विकास करण्याची घोषणा केली आहे. साईबाबांचे जन्मस्थळ पाथरीचा उल्लेख या विधानाचा आम्ही निषेध करतो, असे भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सचिन तांबे यांनी म्हटले आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात तांबे यांनी म्हटले आहे की, साईबाबांनी आपल्या हयातीत कधीही आपले जन्मस्थळ, जात, धर्म सांगितला नाही. साई चरित्रानुसार किंवा साईभक्तांनी लिहिलेल्या अधिकृत ग्रंथांमध्ये कुठेही पाथरी ही साईबाबांची जन्मभूमी आहे, असा उल्लेख आढळत नाही किंवा तसा समकालीन कोणताही संदर्भ आढळत नाही.
साईभक्त, साईबाबा संस्थान आणि शिर्डी ग्रामस्थांच्या मनामध्ये पाथरी हे साईबाबांचे जन्मगाव अशी कुठलीही धारणा अगर श्रद्धा नाही. साईबाबांची जात, धर्म, पंथ, जन्मगाव त्यांचे आई-वडील, असा काहीही उल्लेख नाही. असे साईबाबा सर्वधर्मसमभावाची स्थापना करण्यासाठी साक्षात प्रकट झाले आहेत.
यासंदर्भात शिवसेना खासदार सदाशिव लोखंडे यांच्या उपस्थितीत सर्वपक्षीय निवेदन राष्ट्रपती यांना दिलेले आहे व तसे कुठेही पाथरी ही साईबाबांची जन्मभूमी आहे, असा उल्लेख नसल्याचे त्यांनी देखील मान्य केले आहे, असे असताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी साईबाबांच्या जन्मस्थळ पाथरीचा विकास करणार, असे विधान केले.
या गावाचा विकास करण्याबाबत दुमत नाही. मात्र, साईबाबांचे जन्मस्थळ म्हणून या गावाचा उल्लेख केला गेला, याचा भारतीय जनता युवा मोर्चा निषेध करीत असल्याचे जिल्हाध्यक्ष सचिन तांबे यांनी म्हटले आहे.