अहमदनगर Live24 टीम, 19 जानेवारी 2022 :- काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. त्यानंतर भारतीय जनता पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे.
राज्यात नाना पटोले यांच्याविरोधात भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी १०० हून अधिक ठिकाणी तक्रारी दाखल केल्या आहेत, अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
भांडारी यांनी पत्रकात म्हटले आहे की, पटोले यांच्या विरोधात भारतीय जनता पार्टीतर्फे मंगळवारी राज्यभर आंदोलन करण्यात आले असून,
पटोले यांच्या विरोधात गुन्हे नोंदवून कारवाई केली जाईपर्यंत भारतीय जनता पार्टीचे आंदोलन सुरूच राहील, असे भांडारी यांनी नमूद केले आहे.
गेल्या तीन दिवसांपासून पटोलेंच्या वक्तव्यावरून राजकारण जास्तच तापले आहे. मुख्यमंत्र्यांबद्दल वक्तव्य केल्यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करणारे पोलीस आता कुठे गेले, असा सवालही भाजपकडून विचारण्यात येत आहे.
देशाचे यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या विरोधात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मी मोदींना मारू शकतो, शिव्या देऊ शकतो अशा शब्दात गरळ ओकली आहे.
नाना पटोले यांच्यावर तात्काळ कारवाई करावी यासाठी मुंबई भाजपा अध्यक्ष व आमदार मंगल प्रभात लोढा यांच्या नेतृत्वात भाजपा मुंबई तर्फे मंत्रालय परिसरात साखळी उपोषण करण्यात येत आहे.
जोपर्यंत नाना पटोले यांच्यावर कारवाई होत नाही, तोपर्यंत उपोषण चालूच ठेवणार असा इशारा मंगल प्रभात लोढा यांनी दिला आहे.