नेवासा नगरपंचायतीमधील भाजपची सत्ता संपुष्टात !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / नेवासा :-  संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या नेवासा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी ‘क्रांतिकारी’च्या योगिता सतिश पिंपळे तर उपनगराध्यक्षपदी नंदकुमार पाटील निवडून आले आहेत. यानिमित्ताने नगरपंचायतीमधील भाजपची सत्ता संपुष्टात आली आहे.

आ. शंकरराव गडाखांच्या नेतृत्वाखालील ‘क्रांतिकारी’चे वर्चस्व निर्माण झाले आहे. आ. गडाख शिवसेनेचे सहयोगी सदस्य असल्याने नेवाशात भगवा झेंडा फडकला आहे. नगराध्यक्षपदाचा अडीच वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर या पदाचे आरक्षण बदलून खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षित झाले.

त्यानंतर नगरपंचायतीत क्रांतिकारीचे राज येण्याची स्पष्ट चिन्हे दिसत असतानाच या पक्षाच्या प्रभाग १३ मधील नगरसेविका फिरोजबी इमामखान पठाण यांचे पद अतिक्रमणाच्या मुद्यावरून रद्दबातल ठरविण्यात विरोधकांना यश आले. त्यामुळे या नगरपंचायतीत क्रांतिकारीचे ८ व भाजपचे ८ असे समान पक्षीय बलाबल निर्माण होऊन नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदासाठी चुरस निर्माण झाली होती.

या पदांच्या निवडीचा कार्यक्रम घोषित झाल्यानंतर नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदांसाठी अनुक्रमे क्रांतिकारीकडून योगिता सतिश पिंपळे व नंदकुमार पाटील तर भाजप आघाडीकडून शालिनी संजय सुखदान व रणजित दत्तात्रय सोनवणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.

दरम्यान, अपात्र ठरविल्या गेलेल्या नगरसेविका फिरोजबी पठाण यांच्या पुनर्विचार याचिकेवर मंत्रालयात मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर सुनावणी होऊन पुनर्विलोकनांती राज्य शासनाचा दि. २६ जुलै २०१९ व जिल्हाधिकाऱ्यांचा दि. २३ जानेवारी २०१९ चा अपात्र ठरविण्याबाबतचा आदेश त्यांनी रद्द ठरविल्याने श्रीमती पठाण यांच्याबरोबरच ‘क्रांतिकारी’ला तात्पुरता का होईना दिलासा मिळून या निवडणुकीत पारडे जड झाले आहे.

बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेस सुरुवात झाली. यावेळी ‘क्रांतिकारी’चे सर्व नऊ नगरसेवक यावेळी उपस्थित होते. याउलट भाजपच्या नगरसेवकांचे संख्याबळ ८ असताना यावेळी केवळ ७ नगरसेवकच उपस्थित होते. प्रभाग ४ मधील भाजप नगरसेविका अनिता भारत डोकडे यावेळी अनुपस्थित राहिल्या.

हात उंचावून यावेळी मतदान घेण्यात आले. क्रांतिकारीच्या पिंपळे व पाटील यांना ९ नगरसेवकांचे तर भाजपच्या सुखदान व सोनवणे यांना ७ नगरसेवकांचे समर्थन मिळाले. त्यामुळे नगराध्यक्षपदी योगिता पिंपळे व उपनगराध्यक्षपदी नंदकुमार पाटील यांची ९ विरुद्ध ७ मतांनी निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले.

या निवडीनंतर ‘क्रांतिकारी’ व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत गडाख यांनी नवनिर्वाचित नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांचा सत्कार केला. प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन यांनी पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहिले. मुख्याधिकारी समीर शेख यांनी त्यांना याकामी मदत केली.

This Story First Publish on Ahmednagarlive24.com
No1 News Network Of Ahmednagar
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24