महाराष्ट्र

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर टोमॅटोची वाहतूक करणाऱ्या टेम्पोचा ब्रेक फेल ! १४ टन टोमॅटोचा माल रस्त्यावर

Published by
Ahmednagarlive24 Office

Maharashtra News : सध्या टोमॅटोला सोन्याचे भाव आल्याने घरात भाजी बनवताना महिला वर्ग काटकसर करीत आहे. मात्र अशातच सोमवारी दुपारी मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर टोमॅटोची वाहतूक करणाऱ्या टेम्पोचा ब्रेक फेल झाला. भरधाव वेगाने जाणारा टेम्पो कलंडल्याने जवळपास १४ टन टोमॅटोचा माल रस्त्यावर पसरून मोठी नासाडी झाली. सुदैवाने अपघातग्रस्त न आल्याने मोठा अनर्थ टळला.

टेम्पोचालक राकेश कुमार पुण्याहून १४ टन टोमॅटोचे ४३० कॅरेट घेऊन वाशीतील एपीएमसी मार्केटच्या दिशेने येत होता. बोरघाटातून खालापूर टोलनाक्याजवळ दुपारी सव्वाबाराच्या सुमारास टेम्पोचा ब्रेक फेल झाला आणि भरधाव वेगाने जाणाऱ्या टेम्पोवर नियंत्रण मिळवण्यात चालकाला अपयश आले.

परिणामी टोलनाक्याजवळील दुभाजकाला धडकून टेम्पो पलटी झाला. त्यामुळे टेम्पोतील टोमॅटोचे क्रेट रस्त्यावर पसरून टोलनाक्यातून बाहेर पडणारी मार्गिका बंद झाली.

आयआरबी डेल्टा फोर्सच्या कर्मचाऱ्यांनी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पर्यायी दुसरी मार्गिका सुरू केली. वाहतूक पोलीस आणि आयआरबीच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत टेम्पो दूर केल्यानंतर खोळंबलेली वाहतूक पूर्ववत झाली.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office