महाराष्ट्र

कॉपीबहाद्दर विद्यार्थ्यांने उत्तरपत्रिकेमध्ये ‘मला पास करा’ लिहून चिकटविल्या पाचशेच्या नोटा ! विद्यापीठाने दिली अशी शिक्षा…

Published by
Ahmednagarlive24 Office

Maharashtra News : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या उन्हाळी- २०२३ परीक्षेमध्ये कॉपीबहाद्दर विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.

बी. सी. ए. प्रथम वर्ष अभ्यासक्रमाच्या परीक्षेमध्ये एका विद्यार्थ्याने त्याच्या सातही पेपरच्या उत्तर पत्रिकेमध्ये चक्क पाचशे रुपयांच्या नोटा चिकटवून ‘मला पास करा’ असे लिहून पर्यवेक्षकाकडे सादर केल्या आहेत.

नांदेड येथील एका विद्यार्थ्याने बी. सी. ए. प्रथम वर्ष अभ्यासक्रमाच्या परीक्षेमध्ये त्याच्या सातही पेपरच्या उत्तरपत्रिकांमध्ये चक्क पाचशे रुपयांच्या कडक नोटा चिकटवून ‘मला पास करा’ असे लिहून परीक्षकांकडे सादर केल्या.

नांदेड येथील मूल्यांकन केंद्रावर ही बाब परीक्षकांच्या निदर्शनास आल्यानंतर त्या सातही उत्तरपत्रिका जशाच्या तशा सीलबंद करून विद्यापीठाकडे पाठविण्यात आल्या. सदर गैरवर्तन प्रकरण महाराष्ट्र सार्वजनिक अधिनियम २०१६ अन्वये विद्यापीठाच्या गठीत ४८ (५) (अ) समितीपुढे चौकशीसाठी ठेवण्यात आले होते.

समितीने सदर गैरवर्तणूक प्रकरणी सखोल चौकशी करून संबंधित विद्यार्थ्याची सर्व विषयांची संपादणूक रद्द करून त्यास पुढील एकूण चार परीक्षेसाठी बंदी घातली. चिकटविलेली रक्कम ३५०० रुपये कुलगुरू फंडामध्ये जमा करण्यात आली आहे.

लातूर जिल्ह्यातील एका परीक्षा केंद्रावर बनावट प्रवेश परीक्षा प्रमाणपत्र तयार करून महाविद्यालयातील दुसऱ्याच तोतया विद्यार्थ्याने परीक्षा दिली. परीक्षेच्या शेवटच्या दिवशी सदर बाब परीक्षा केंद्राच्या लक्षात आली. संबंधित परीक्षा केंद्राने हे प्रकरण विद्यापीठाच्या निदर्शनास आणून दिले.

त्यानुसार गठीत समितीपुढे प्रकरण चौकशीसाठी ठेवण्यात आले. समितीने खऱ्या आणि तोतया अशा दोन्हीही परीक्षार्थीना बोलावून कसून चौकशी केली. चौकशीअंती दोघांनाही गुन्हा कबूल केला. याबाबत दोघांचीही उन्हाळी – २०२३ परीक्षेतील संपादणूक रद्द करून त्यांच्यावर पुढील चार परीक्षेसाठी बंदी घालण्यात आली आहे.

विद्यापीठातर्फे अशी कडक शिक्षा देण्यासंबंधी मागील दहा वर्षांतील पहिलीच घटना आहे. भविष्यात अशा प्रकारच्या नक्कलबहाद्दरांवर कठोर कारवाई करण्याच्या दृष्टीने विशेष पथक नेमण्यात येणार असल्याचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. दिगंबर नेटके यांनी सांगितले.

Ahmednagarlive24 Office