मनोज जरांगे पाटील यांचे आरक्षणासंदर्भात आंदोलन राज्यभर गाजले. परंतु या आंदोलनावर व मनोज जरांगे पाटील यांच्यावर नगर येथील कीर्तनकार अजय महाराज बारस्कर यांनी टीका केली होती.
त्यानंतर ते वादग्रस्त ठरले होते. आता त्यांची कार पंढरपूर येथे जळालेल्या अवस्थेत सापडली असल्याची माहिती समोर आली आहे. बारस्कर यांनी ही कार कोणीतरी अज्ञाताने पेटवून दिल्याचा आरोप केला आहे.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी : अहमदनगर जिल्ह्यातील कीर्तनकार अजय महाराज बारस्कर हे पंढरपूर याठिकाणी १६ तारखेला गेले होते. आषाढी एकादशीनिमित्त ते दर्शनासाठी गेलेले होते. तेथे गेल्यानंतर त्यांनी तेथे असणाऱ्या पार्किंगमध्ये आपले वाहन लावले होते.
हे पार्किंग जवळपास ६५ एकर असल्याचे समजते. तेथे गाडी लावून ते चंद्रभागेत अंघोळीसाठी गेले होते.दर्शन वगैरे आटोपल्यानंतर ते १७ तारखेला पुन्हा पार्किंगमध्ये आपल्या वाहनाजवळ आले.
परंतु त्यांना तेथे आपली कार जळालेल्या अवस्थेत दिसली. त्यानंतर कीर्तनकार अजय महाराज बारस्कर यांनी याची कल्पना पंढरपूर पोलिसांना दिली.
जरांगे पाटील यांवरील टीकेनंतर धमक्या
त्यांच्या सावेडी गावातूनही मराठा समाजाने त्यांचा निषेध केला होता. दरम्यान या टीकेनंतर सतत धमक्या येत आहेत असे बारस्कर यांचे म्हणणे आहे. त्यामुळे ही कार पेटली नसून पेटवली असल्याचा संशय आता बारस्कर यांनी व्यक्त केलाय.