अहमदनगर Live24 टीम, 02 फेब्रुवारी 2021:- मुंबईच्या गोरेगाव पश्चिम येथील एका स्टुडिओला भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे. हा स्टुडिओ इनऑर्बिट मॉलजवळ असून स्टुडिओला लागलेली भीषण आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 8 ते 10 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहे.
बांगूर नगर येथील एका फिल्म स्टुडिओला आज दुपारी साडेचार वाजता लागली. स्टुडिओला आग लागल्याचं कळताच अग्निशमन दलाच्या गाड्यांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली.
तब्बल 8 ते 10 अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. त्यानंतर आग विझवण्याचे काम सुरू झालं होतं. या स्टुडिओत खुर्च्या आणि इतर फर्निचर होतं.
त्यामुळे आगीने लाकडी सामानाला तात्काळ पेट घेतला. त्यातच सोसायट्याचा वारा सुटल्याने ही आग अधिकच भडकली. बघता बघता आगीने उग्ररुप धारण केलं होतं.
आग आणि धुराचे लोट पसरल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली होती. शॉर्टसर्किटने आग? हा स्टुडिओ बंद होता. पण त्यात शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, मोठ्याप्रमाणावर वित्तहानी झाली आहे. तसेच आगीत आणखी कोणी अडकलंय का? याचा शोध घेण्यात येत आहे.
पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेऊन घटनेची माहिती घेतली आहे. या स्टुडिओत अग्निरोधक यंत्रणा होती की नाही? याचाही तपास करण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.