Maharashtra News : राज्यातील बहुचर्चित आमदार अपात्रते बाबतचा निकाल काल बुधवारी विधानसभेचे अध्यक्ष ना. राहुल नार्वेकर यांनी देऊन १६ आमदार अपात्र करण्याची याचिका फेटाळली. याशिवाय शिवसेना ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीच असल्याचा निकाल त्यांनी दिल्याने संगमनेर शहरात याची संतप्त प्रतिक्रिया उमटली.
संतप्त झालेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी संगमनेर बसस्थानकाच्या बाहेर काल बुधवारी (दि.१०) रात्री आंदोलन केले. या कार्यकर्त्यांनी नार्वेकर यांच्या प्रतिमेला जोडे मारून त्यांच्या प्रतिमेचे दहन केले. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या विरोधात निकाल गेल्याची माहिती मिळताच,
काल रात्री ८ वाजेच्या सुमारास शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने संगमनेर बस स्थानकाच्या बाहेर नाशिक-पुणे महामार्गावर जमा झाले. ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख संजय फड व माजी नगरसेवक कैलास वाकचौरे यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आंदोलन करण्यात आले.
याप्रसंगी कार्यकर्त्यांनी विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर यांच्या निषेधाच्या जोरदार घोषणा दिल्या. संतप्त कार्यकर्त्यांनी नार्वेकर यांच्या प्रतिमेस जोडे मारून प्रतिमेचे दहन केले. याप्रसंगी संजय फड यांनी नार्वेकर यांचा निषेध केला. सभापतीनी चुकीचा निर्णय दिला असल्याने कार्यकर्ते चवताळले आहे. आगामी निवडणुकीमध्ये सत्ताधाऱ्यांना जागा दाखवली जाईल असा इशारा फड यांनी दिला.
नार्वेकर यांनी दिलेला निकाल हा चुकीचा असून आम्ही निषेध करतो असे कैलास वाकचौरे यांनी सांगितले. या आंदोलनामध्ये किशोर पवार, समीर ओझा, योगेश बिचकर, अशोक सातपुते, विलास भोंडवे, अमोल म्हस्के, अमोल कवडे,
दिव्यांग सहाय्य सेनेचे जिल्हाध्यक्ष जालिंदर लहामगे, शैलेश सूर्यवंशी, अजित मोमीन, भैया तांबोळी, तात्यासाहेब गुंजाळ, अमित चव्हाण, निलेश रहाणे, सलमान शेख, नारायण पवार, बाळू घोडके यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.