अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2021 :-सर्वसामान्यांच्या नावावर खोटी वीजबिलं टाकून, त्यांची पठाणी वसुली सुरू आहे. वाढीव वीजबिलांवर जनतेला अंधारात लोटणाऱ्या राज्य सरकारची ही मिजासखोरी असल्याची घणाघाती टीका माजी आमदार तथा भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी केली.
कोल्हे यांनी पत्रकात म्हटले, की वाढीव वीज बिल हा सरकारचा विषय आहे, असं वक्तव्य राज्याचे ऊर्जामंर्त्यांनी केला आहे. यावरुन राज्याचे ऊर्जामंत्री नितिन राऊत हे राज्य सरकारचे मंत्री नाहीत का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
लॉकडाऊन काळात सर्वांना अन्यायकारक वीजबीलं दिल्यानंतरही, ना. राऊत असं वक्तव्य कसं करु शकतात? असा सवालही त्यांनी केला. कोरोना काळात लोकांना वीजबिल माफ करण्याचे आश्वासन देऊन सरकारने लोकांच्या तोंडाला पाने पुसली.
वीजबिल माफ करणे तर सोडाच; परंतु वाढीव वीज देऊन सरकारने सर्वसामान्यांचे खिसे कापले आहेत. ही फसवणूक आहे. लॉकडाऊनच्या काळात मीटर रिडिंग घेता आलं नाही, जे अंदाजाने दिलं गेलं, तो अंदाज आता सुधारता येणार आहे.
कारण लॉकडाऊन लागण्याआधी काय मीटर रिडिंग होतं आणि आता काय आहे, यावरुन वीजेचा वापर समजू शकतो, तरी वाढीव आणि अन्यायकारक वीजबिल सर्वसामान्य जनतेवर किती दिवस सरकार लादणार आहे? असा प्रश्न उपस्थित करून पुन्हा पुन्हा वीज बिलाच्या मुद्द्यावर सर्वसामान्यांना वेठीस धरणारे हे सरकार भूमिका बदलताना दिसत नाही.
तेंव्हा ही पठाणी वसुली ताबडतोब थांबवून लोकांना अंधारात लोटण्याची भूमिका घेऊ नये, त्या ऐवजी वाढीव बिलात ५० टक्के सूट देऊन उर्वरित ५० टक्के बिलांचे हप्ते पाडून द्यावेत, अशी मागणी स्नेहलता कोल्हे यांनी केली आहे.