जातीवाचक शिवीगाळ करणाऱ्या भाजपाच्या माजी पदाधिकार्‍याविरोधात गुन्हा दाखल!

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,5 ऑक्टोबर 2020 :- संगमनेर तालुक्यातील नान्नज येथे दुकान लावणाऱ्या एकाला भाजपच्या पदाधिकाऱ्याने जातीवाचक शिवीगाळ केल्याने या विरोधात ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी कि, तालुक्यातील घुलेवाडी येथील तीस वर्षीय तरुणाचा खारी-टोस्ट विक्रीचा फिरता व्यवसाय आहे. ठिकठिकाणचे बाजार करून हा तरुण आपला उदरनिर्वाह करतो.

सदर तरुणाने रविवारी (ता.4) नांदुरी दुमाला येथील बाजारतळावर आपल्या मारुती ओमनी या वाहनातच दुकान थाटले. मात्र काही वेळातच तेथील रहिवासी व भारतीय जनता पार्टीचे माजी पदाधिकारी असलेल्या

भिमराज चत्तर यांनी त्या तरुणाला तेथून दुकान काढण्यास सांगीतले. त्या तरुणानेही काढतो म्हणत दुकान आवरायला सुरुवात केली,

मात्र दरम्यानच्या काळात संबंधित इसमाने त्या तरुणाला शिवीगाळ व दमबाजी करीत जातीवाचक उल्लेख करुन त्या तरुणाचा अपमान केल्याचा आरोप त्याने तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत केला आहे.

श्रीरामपूर विभागाचे पोलीस उपअधीक्षक राहुल मदने यांनी या प्रकरणाची शहनिशा केल्यानंतर दुपारी साडेचार वाजता घडलेल्या या प्रकरणाचा गुन्हा आज एक वाजण्याच्या सुमारास दाखल केला आहे.

संबंधित तरुणाच्या फिर्यादीवरुन तालुका पोलिसांनी संशयीत आरोपी भिमराज चत्तर (रा.नान्नज दुमाला) यांच्या विरोधात अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास श्रीरामपूरचे पोलीस उपअधीक्षक राहुल मदने करीत आहेत.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24