महाराष्ट्रातील या भागांत वादळी पाऊस पडण्याची शक्यता

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 ,3 मे 2020 :- महाराष्ट्रात विविध भागांमध्ये पूर्वमोसमी पावसाने दणका दिला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात काही ठिकाणी वादळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रात सातारा, कोल्हापूर तर विदर्भात नागपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यांत वादळी पावसाचा इशारा दिला गेला आहे.

राज्यातील उर्वरित भागांमध्ये ढगाळपणा असेल, तर उष्ण व दमट हवामानाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मध्य प्रदेश, विदर्भ, तेलंगणा, रायलसीमा, तामिळनाडूपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.

बंगालच्या उपसागरातील दक्षिण भागात चक्राकार वाऱ्यांच्या प्रभावामुळे शुक्रवारी दक्षिण अंदमान समुद्र आणि परिसरावर कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली.

लागूनच समुद्रसपाटीपासून ४.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. रविवारपर्यंत हे कमी दाबाचे क्षेत्र अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. उपसागरात चक्रीवादळाचे संकेत असून ते बांगलादेश, म्यानमारकडे सरकण्याचा अंदाज आहे.

समुद्रात ताशी ५० ते ७० किलोमीटर वेगाने वारे वाहून, समुद्र खवळणार असल्याने मासेमारीसाठी खोल समुद्रात जाऊ नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, उन्हाची काहिलीही वाढली असून धुळे, जळगावसह मालेगाव, निफाड, सोलापूर, परभणी, नांदेड, अकोला, अमरावती, बुलडाणा, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, नागपूर, वाशिम व वर्धा येथे तापमान ४० अंश सेल्सियसच्या पुढे गेले आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com® 

अहमदनगर लाईव्ह 24