अहमदनगर Live24 टीम, 07 जानेवारी 2022 :- पंजाबमध्ये पंतप्रधान मोदी सुरक्षेबाबत आज घडलेल्या गंभीर घटनेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नौटंकी म्हणणे निषेधार्ह आहे. नौटंकी करणे हा नाना पटोले यांचा स्वभाव आहे.
त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी तोंड सांभाळून बोलावे’, असा इशारा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिलाय.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा पंजाबमध्ये रोखण्यात आल्यानंतर एकीकडे भाजपा नेत्यांकडून जोरदार टीकास्त्र सुरु असताना मुंबईत मंदिरात जाऊन प्रार्थना करण्यात आली.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुंबईचं ग्रामदैवत असलेल्या मुंबादेवीला जाऊन मोदींच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेसोबतच वेगवेगळ्या मुद्द्यावंर भाष्य केलं.
पंतप्रधान मोदी हे पंजाब दौऱ्यावर असताना त्यांच्या सुरक्षेत मोठी चूक झाली. त्यामुळे मोदींना जवळपास 20 मिनिटे आपल्या गाडीतच बसून राहावे लागले.
त्यानंतर ते आपल्या दौरा रद्द करत पुन्हा दिल्लीला परतले. या प्रकारामुळे भाजप आणि काँग्रेस नेत्यांमध्ये जोरदार राजकारण पाहायला मिळत आहे.
पंजाबमध्ये झालेल्या प्रकारावर काॅंग्रेस नेते नाना पटोले यांनी ‘नौटंकी’ असल्याचं म्हंटलं. त्याचबरोबर इंदिरा गांधी आणि नरेंद्र मोदी यांची तुलनाच होऊ शकत नाही, यावर चंद्रकांत पाटील यांना प्रश्न विचारल्यानंतर ते म्हणाले की, “तुलना कोणाचीच कोणाशी होत नाही.
पण इंदिरा गांधींशी तुलना करुन त्यांच्याप्रमाणेच मोदींचं व्हावं अशी अपेक्षा करत आहात का? आपण काय बोलतो, त्याचा काय अर्थ लागतो याचा आपल्याला तरी पत्ता असतो का? नौटंकी तर तुम्ही करत आहात.
विधानसभा अध्यक्षाचा राजीनामा देता, राज्याचे अध्यक्ष होता. मंत्रिमंडळाची इच्छा व्यक्त करता”, असं मत पाटील यांनी मांडलं.