मुंबई :राज्यात निवडून आलेल्या जागा आणि मिळालेल्या मतदानामध्ये भाजपच नंबर वन असून राज्यात भाजपशिवाय कुणाचंच सरकार येणार नाही. असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला.
राज्यात क्रमांक एकचा पक्ष भाजपाच आहे. भाजपाचे १०५ आमदार निवडून आले आहेत. मित्रपक्ष तसेच अपक्ष आमदार ज्यांनी भाजपाला समर्थन दिले आहेत असे १४ धरून भाजपाचे संख्याबळ ११९ होते.
त्यामुळे भाजपाला वगळता राज्यात सरकार स्थापनच होऊ शकत नाही. भाजपाचेच सरकार राज्यात येणार असून मुख्यमंत्रीदेखील भाजपाचाच असेल, असा ठाम विश्वास भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाच्या बैठकीत हीच भूमिका मांडल्याचे त्यांनी सांगितले.भाजपाच्या दादर येथील वसंतस्मृती कार्यालयात तीनदिवसीय चिंतन बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी पत्रकारांना माहिती देताना चंद्रकांत पाटील बोलत होते.
राज्यात सध्या ज्या राजकीय घडामोडी सुरू आहेत त्यांच्यावर भाजपाचे पूर्ण लक्ष असल्याचे सांगून चंद्रकांत पाटील म्हणाले, विधानसभा निवडणुकांचा निकाल पाहिल्यानंतर भाजपाच राज्यात क्रमांक एकचा पक्ष असल्याचे सिद्ध होते.
भाजपाला १ कोटी ४२ लाख मते मिळाली. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर ९२ लाख मते घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस आहे. त्यानंतर शिवसेनेला ९० लाख मते मिळाली आहेत.
आगामी काळात भाजपाच्या नेतृत्त्वातच सरकार स्थापन होईल हे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याचं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं.