अहमदनगर Live24 टीम, 9 जानेवारी 2021 :- भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालय मध्ये अतिदक्षता नवजात केयर युनिटमध्ये आग लागल्यामुळे दहा बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
या पार्श्वभूमिवर शहरातील महापालिकेच्या बाळासाहेब देशपांडे रुग्णालया सह ,धर्मादाय ट्रस्ट, सरकारी,खासगी संस्था च्या मालकीच्या रुग्णालयांची फायर तपासणी तातडीने करावी. अशी मागणी शहर जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्षा स्मिता पोखरणा यांनी प्रभारी महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
महाराष्ट्र आग प्रतिबंधक जीव संरक्षण कायदा, 2006 नुसार, रुग्णालय इमारतींचे नियमित ‘फायर सेफ्टी ऑडिट’ करण्याची जबाबदारी ही त्या इमारतीची मालकी असलेल्या व्यक्ती किंवा संस्थेकडे असते.
या कायद्याच्या कलम 3 मधील तरतुदींनुसार संबंधित व्यक्ती अथवा संस्थेने परवानाधारक एजन्सीकडून वर्षातून दोन वेळा इमारतीचे ‘फायर सेफ्टी ऑडिट’ करून घ्यायचे असून, या तपासणीचे प्रमाणपत्र दरवर्षी जानेवारी आणि जुलै महिन्यात अग्निशमन विभागाच्या मुख्य अधिकाऱ्यांच्या कार्यालयाकडे सादर करणे बंधनकारक आहे.
शहरातील अनेक रुग्णालये आपल्या इमारतींचे फायर सेफ्टी ऑडिट करून घेण्यास टाळाटाळ करतात. खुद्द अग्निशमन विभागही या तरतुदींच्या अंमलबजावणीबाबत उदासीन असल्याचे दिसत आहे. अनेक ठिकाणी फायर सिलिंडर हे शोभे साठीच लावलेले असून, त्याची वैधता संपली तरी त्याचे रिफिलिंग केले जात नाही.
त्यामुळे रुग्णांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. शहरातील उपरोक्त रुग्णालय चा फायर सेफ्टी ऑडिट अहवाल सादर केला आहे. याची तपासणी करावी व जे रुग्णालय या आदेशाचे पालन करणार नाही त्यांच्यावर अग्निशमन कायदा आणि रूग्णालय नोंदणी कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी निवेदनात केली आहे.